बनवासी येथे उद्यापासून कदंबोत्सवाचे आयोजन
कारवार : जिल्हा पालकमंत्री व मासेमारी आणि बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य आणि कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी बेंगळूर मुक्कामी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन ‘कदंबोत्सवाची’ निमंत्रण पत्रिका दिली. शिर्सी तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध बनवासी येथे 12 आणि 13 रोजी कदंबोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कन्नड राजवटीची पहिली राजधानी म्हणून बनवासीची ओळख आहे. शिर्सापासून 22 किलोमीटर अंतरावर वसलेल्या बनवासी गावाची कदंबाची राजधानी म्हणून ओळख आहे. येथील मधुकेश्वर देवालयामुळे बनवासीची प्रसिद्धी दूरवर पसरली आहे.
कारवार जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती खाते, पर्यटन खाते आणि बनवासी अभिवृद्धी प्राधिकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कदंबोत्सव 2025 चे उद्घाटन 12 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. कदंबोत्सवाचे औचित्य साधून कन्नड साहित्यातील कर्नाटक सरकारकडून दिला जाणारा ‘पंप पुरस्कार 2024-25’ हंपी येथील कन्नड विश्वविद्यालयाचे निवृत्त कुलपती डॉ. बी. ए. विवेक रै यांना प्रदान करण्यात येणार आहे. कदंबोत्सवाच्या निमित्ताने भरगच्च मनोरंजन, सांस्कृतिक-क्रीडा स्पर्धा, प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात आले आहे. कदंबोत्सवासाठी बनवासी येथील ‘मयुखर्मा व्यासपीठ’ आणि परिसर सज्ज झाला आहे.