विश्वचषक कबड्डी स्पर्धा इंग्लंडमध्ये
वृत्तसंस्था/ लंडन
2025 च्या विश्वचषक पुरुष आणि महिलांच्या कब•ाr स्पर्धेला लंडनमध्ये मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. भारताचे पुरुष आणि महिला कबड्डी संघ हे या स्पर्धेतील विद्यमान विजते असून आता हे संघ पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्न करतील.
ब्रिटनमधील चार शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. बर्मिंगहॅम, कॉव्हेंट्री, वेलसॉल आणि वुलव्हरहॅम्पटन या चार शहरांमध्ये सामने होतील. पुरुषांच्या विभागात एकूण 10 संघांचा समावेश असून हे संघ दोन गटांमध्ये विभागले जातील. अ गटामध्ये हंगेरी, यजमान इंग्लंड, पोलंड, जर्मनी आणि अमेरिका तर ब गटामध्ये विद्यमान विजेता भारत, इटली, स्कॉटलंड, वेल्स आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. पुरुष विभागात भारताचा सलामीचा सामना इटलीबरोबर होणार आहे. सदर स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाणार असून प्रत्येक गटातील चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्यपूर्व फेरी 21 मार्चपासून खेळवली जाईल.
महिलांच्या विभागात एकूण सहा संघांचा समावेश आहे. हे संघ दोन गटात विभागण्यात आले आहेत. ड गटामध्ये भारत, वेल्स आणि पोलंड तर इ गटामध्ये हाँगकाँग, हंगेरी आणि यजमान इंग्लंड यांचा समावेश आहे. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना मंगळवारी वेल्स बरोबर होईल. महिलांच्या विभागात प्रत्येकी गटातील दोन आघाडीचे संघ उपांत्य फेरी गाठतील. उपांत्य सामने 21 मार्चपासून खेळविले जातील. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलांच्या विभागात उपांत्य फेरीत हरणाऱ्या संघांमध्ये तिसऱ्या स्थानासाठी प्लेऑफ सामना अनुक्रमे 23 आणि 22 मार्च रोजी खेळविला जाईल. आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनतर्फे पहिली विश्वचषक कबड्डी स्पर्धा 2019 साली मलेशियात खेळविली गेली होती. मलेशियातील या स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला विभागातील अजिंक्यपद मिळविले होते. पुरुष विभागात भारताने अंतिम सामन्यात इराकचा तर महिलांच्या विभागात भारताने चीन तैपेईचा पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला होता. आशिया खंडाच्या बाहेर पहिल्यांदाच 2025 ची विश्वचषक कबड्डी स्पर्धा भरविली जात आहे.