Satara : कास ग्रामस्थांची स्वच्छता मोहीम; दारू-मटण पार्ट्यांवर बंदीची मागणी
कास तलाव परिसरात ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता
सातारा : जागतिक वारसास्थळ असलेले कास पुष्प पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कासला येत असतात मात्र पठार पाहून झाल्यावर काही स्थानिक आणि बाहेरील पर्यटक येथे दारू,मटणाच्या पार्ट्या करून कास भकास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कास ग्रामस्थांनी एकत्र येत कास स्वछता अभियान राबवत मोठ्याप्रमाणात कचरा, दारूच्या बाटल्या गोळा करत त्याची विल्हेवाट लावली आहे. सातारा पालिकेने कास परिसरात दररोज पालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेमावेत आणि कास तलाव परिसराची स्वछता करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
कासमध्ये बाहेरील पर्यटक पर्यटनासाठी येतात मात्र सोबत मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू,दारूच्या बाटल्या इतरत्र टाकून परिसर दूषित करतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना सूचना फलकासोबत त्यांना स्वच्छतेचे मार्गदर्शन करणे गरजेचे असून येथे पार्टी करणाऱ्या तळीरामांना सातारा पोलिसांकडून चाप बसवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कास तलावात पर्यटकांसाठी नव्याने बोटिंग आणि विविध सुविधा उपलब्ध झाल्या असून यांची निगा देखील राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.