वायनाडमध्ये राहुल गांधींसमोर के. सुरेंद्रन यांचे आव्हान
वृत्तसंस्था /वायनाड
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. सुरेंद्रन यांनी गुरुवारी वायनाड मतदारसंघासाठी स्वत:चा अर्ज भरला आहे. यादरम्यान त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी होत्या. केरळमधील वायनाड हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परिसीमनानंतर 2009 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. तेव्हापासून सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस येथे विजयी झाला आहे. वायनाड हा मुस्लीमबहुल मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या बुधवारच्या रोड शोदरम्यान मुस्लीम लीगचे झेंडे लपविण्यात आले. एक तर राहुल गांधी यांना मुस्लीम लीगच्या पाठिंब्याची लाज वाटत असावी किंवा उत्तर भारतीय लोकांपासून स्वत:चे मुस्लीम लीगसोबतचे संबंध ते लपवू पाहत असावेत, अशी टीका इराणी यांनी केली आहे.