के. आर. शेट्टी संघ अंतिम फेरीत
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात के. आर. शेट्टी लायाज संघांने सिग्निचर स्पोर्ट्स क्लबचा 7 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आदी नलवडेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए बेळगाव मैदानावर झालेल्या सामन्यात सिग्निचर स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 17.1 षटकात सर्वगडी बाद 60 धावा केल्या. त्यात श्रेयस व मनोज यांनी 2 चौकारांसह प्रत्येकी 12 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे आदिने 17 धावांत 4 गडी तर साहीलने 20 धावांत 3 गडी, किरण तरळेकरने 10 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टीने 10.5 षटकात 3 गडी बाद 61 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात साहीलने 25, आदिने 16 तर श्रीसाई व अक्षय यांनी नाबाद प्रत्येकी 7 धावा केल्या.