For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के.सी. त्यागींचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

06:14 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
के सी  त्यागींचा प्रवक्तेपदाचा राजीनामा
Advertisement

वक्तव्यं भोवली : संजदकडून राजीव रंजन यांना जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते के.सी. त्यागी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने त्यांच्याजागी राजीव रंजन यांना राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यागी यांना संजद आणि नितीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. दिल्लीत बसून प्रत्येक मुद्द्यावर टिप्पणी करणे त्यागी यांना भोवल्याची चर्चा आहे. तर त्यागी हे पक्षाचे विशेष सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

Advertisement

अनेक मुद्द्यांवर त्यागी यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे संजद आणि रालोआत मतभेद असल्याची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने रालोआतील मतभेद फेटाळण्यासाठी संजदला समन्वय राखण्याची सूचना केली होती. याच प्रकरणी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री ललन सिंह तसेच संजय झा यांनी त्यागी यांची भेट घेत त्यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद सोडण्याची विनंती केली होती. के.सी. त्यागी यांनी वैयक्तिक कारणांमुळे प्रवक्तेपद सोडल्याचे पक्षाकडून आता सांगण्यात आले आहे.

त्यागी यांनी अनेक मुद्द्यांवर पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरुद्ध मत मांडले होते. तसेच यासंबंधी त्यांनी पक्षाच्या नेतृत्वासोबत चर्चा केली नव्हती. विदेश धोरण, युपीएससीमधील लेटरल एंट्री, अनुसूचित जाती-जमाती आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्वत:चे विचार हे पक्षाचे विचार असल्याप्रमाणे मांडले हेते, यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला होता.

इस्रायल मुद्द्यावर विरोधी पक्षांचे समर्थन

त्यागी यांनी इस्रायलला केला जाणारा शस्त्रास्त्रपुरवठा रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या संयुक्त वक्तव्यावर स्वाक्षरी केली होती. तसेच इस्रायलकडून सुरू असलेली कारवाई ही मानवतेच्या विरोधात असल्याचे या वक्तव्यात नमूद करण्यात आले होते. तसेच त्यांनी युपीएससीमधील लेटरल एंट्रीलच्या मुद्द्यावर पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा न करता वक्तव्य केले होते. एकप्रकारे त्यांनी लेटरल एंट्रीप्रकरणी रालोआ सरकारलाच  लक्ष्य केले होते. यामुळे संजदची चांगलीच कोंडी झाली होती.

Advertisement
Tags :

.