युरोप दौऱ्यासाठी ज्योती सिंगकडे कनिष्ठ महिला हॉकी संघाचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या महिन्यात युरोप दौऱ्यावर जाणाऱ्या कनिष्ठ महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून हॉकी इंडियाने डिफेंडर ज्योती सिंगकडे या 22 सदस्यीय संघाच्या कर्णधारपदाची तर साक्षी राणाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे. 21 ते 29 मे या कालावधीत हा दौरा होणार आहे.
या दौऱ्यात भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ तीन देशांविरुद्ध एकूण सहा सामने खेळणार असून बेल्जियम, जर्मनी व नेदरलँड्समधील ब्रेडास हॉकी व्हेरेनिगिंग पुश व ऑरेंज रूड या दोन क्लब संघांचा समावेश आहे. ‘आपल्या संघातील सर्व खेळाडूंमध्ये चांगला सुसंवाद असून शिबिरामध्ये आम्ही सर्वजणांची एकमेकींशी चांगली ओळख झाली आहे. संघातील प्रत्येक खेळाडू कौशल्यपूर्ण व प्रतिभावान आहे,’ असे कर्णधार ज्योती म्हणाली.
भारताचा पहिला सामना 21 मे रोजी ब्रेडेसा हॉकी व्हेरेनिगिंग पुशविरुद्ध ब्रेडा येथे तर याच ठिकाणी 22 रोजी बेल्जियमविरुद्ध दुसरा सामना खेळेल. यानंतरचा सामनाही बेल्जियमविरुद्धच पण त्यांच्या मायदेशात 24 मे रोजी होणार आहे. त्यानंतर जर्मनीविरुद्ध दोन सामने ब्रेडा येथे 26 व 27 मे रोजी होतील. 29 मे रोजी शेवटचा सामना ब्रेडा येथे ऑरेंज रूड संघाविरुद्ध खेळेल.
युरोप दौऱ्यासाठी निवडलेला कनिष्ठ महिला हॉकी संघ : गोलरक्षक-अदिती महेश्वरी, निधी. बचावपटू-ज्योती सिंग (कर्णधार), लालथंटलुआंगी, अंजली बरवा, पूजा साहू, ममिता ओरम, निरुकुल्लू. मध्यफळी-क्षेत्रिमयुम सोनिया देवी, रजनी करकेटा, प्रियांका यादव, खैदेम शिलीमा चानू, साक्षी राणा (उपकर्णधार), अनिशा साहू, सुप्रिया कुजुर. आघाडी फळी-बिनिमा धान, हिना बानो, लालरिपुई, इशिका, संजना होरो, सोनम, कनिका सिवाच.