Vari Pandharichi 2025: विठ्ठल श्रीहरी उभा भीमातीरीं। तिष्ठती कामारी मुक्तिचारी।,
पुढच्या कडव्यामध्ये नीरा व भीमा अशा दोन नद्यांचा उल्लेख आहे
By : ह. भ. प. अभय जगताप
सासवड :
विठ्ठल श्रीहरी उभा भीमातीरीं।
तिष्ठती कामारी मुक्तिचारी ।।
मुनिजनां सुख निरंतर लक्ष।
भक्तां निजसुख देत असे।।
पुंडलिकपुण्य मेदिनीकारुण्य।
उद्धरिले जन अनंत कोटी।।
निरानिरंतर भीमरथी तीर।
ब्रह्म हें साकार इटे नीट।।
नित्यता भजन जनीं जनार्दन।
ब्रह्मादिक खुण पावताती।।
निवृत्ति तत्पर हरीरूप सर्व।
नाम घेतां तृप्त आत्माराम।।
आज जेष्ठ वद्य द्वादशी. संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी दिवस. ज्ञानेश्वर महाराज-आळंदी, सोपानदेव-सासवड, योगी चांगदेव-पुणतांबे, संत मुक्ताबाई-तापीतीर या क्रमाने तीन भावंडे आणि त्यांचे शिष्य चांगदेवांची समाधी झाल्यावर सर्वात शेवटी निवृत्तीनाथांनी जेष्ठ महिन्यात त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली.
या चारही भावंडांच्या विरहामध्ये नामदेवरायांनी ‘गेले दिगंबर ईश्वर विभूती। राहिल्या त्या कीर्ती जगा माजी’ असे उद्गार काढले आहेत. या ‘विठ्ठल श्रीहरी’ अभंगामध्ये निवृत्तीनाथांनी विठ्ठलाचे वर्णन केले आहे. हा विठ्ठल भीमातीरी उभा आहे व चारही मुक्ती त्याच्या कामारी म्हणजे दासी आहेत. विठ्ठल भक्तांना मुक्ती नको असली तरी त्यांना ती सहज मिळू शकते, असा याचा अर्थ आहे.
सतत भगवंताकडे लक्ष लावून असलेल्या मुनिजनांना जे सुख मिळते तेच भजन, कीर्तन करणाऱ्या वारकरी भक्तांना मिळते. परब्रम्ह पंढरपूरला आल्यामुळे भक्तांना सोपी वाट सापडली आहे. कोटी लोकांचा उद्धार झाला आहे व याला पुंडलिक कारणीभूत आहे. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात मेदिनी कारण्य म्हणजे पृथ्वीवर करुणा करण्यासाठीच पुंडलिकाने आपल्या पुण्याच्या आधारे देवाला पंढरपुरात आणले आहे.
पुढच्या कडव्यामध्ये नीरा व भीमा अशा दोन नद्यांचा उल्लेख आहे. नीरा नदी नरसिंहपूर येथे भीमा नदीला मिळते आणि तीच भीमा नदी पंढरपूरला येते. ‘नीरा भिवरा पडता दृष्टी। स्नान करता शुद्ध सृष्टी।’ असा नीरा नदीचा उल्लेख नामदेवरायांनीही केला आहे. त्यामुळे पालखी प्रवासात पंढरपूरला जाताना आणि येताना ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या जेव्हा नीरा नदीपाशी येतात तेव्हा नीरास्नान होते.
पालखी रथ नीरा नदीपाशी आल्यावर पादुका पालखीतून काढून नेऊन नदीत पादुकांना स्नान घातले जाते. यावेळी अनेक वारकरी नदीत स्नान करतात. तर या भिवरेकाठी विटेवर ब्रह्म साकार रूपाने उभे आहे. याचे निरंतर भजन करणारे भक्त सर्व लोकांमध्ये देव बघतात, किंबहुना सर्वांमध्ये देव बघणे म्हणजेच एक प्रकारे निरंतर भजन करणे आहे. शेवटच्या चरणात निवृत्तीनाथ म्हणतात की तेही अशा प्रकारे सतत नाम घेतात. सर्व जग हरीरुप बघतात, म्हणजे सर्वत्र देव बघतात व त्यामुळे आत्माराम तृप्त होतो.