न्यायमूर्ती संजीव खन्ना आजपासून ‘सरन्यायाधीश’
राष्ट्रपतींकडून शपथ घेणार : 13 मे 2025 पर्यंत कार्यकाळ
►वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचा भाग असलेले न्यायमूर्ती संजीव खन्ना आज सोमवारी भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील. या शपथविधीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची जागा घेतील. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत असणार आहे.
सरन्यायाधीश म्हणून शुक्रवारी न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. त्यानंतर 10 नोव्हेंबर हा त्यांचा निवृत्तीचा दिवस होता. 16 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने 24 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती खन्ना यांची नियुक्ती अधिकृतपणे अधिसूचित केली होती. त्यानुसार न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. ते दिल्लीचे रहिवासी असून त्यांचे सर्व शिक्षण दिल्लीतूनच झाले आहे. त्यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. त्यांचे वडील न्यायमूर्ती देस राज खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते. तर, त्यांच्या आई श्रीमती सरोज खन्ना या दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमध्ये हिंदीच्या लेक्चरर होत्या. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पॅम्पस लॉ सेंटर, लॉ पॅकल्टी, दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
संजीव खन्ना यांनी 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नावनोंदणी केली. सुऊवातीला तीस हजारी कॉम्प्लेक्स, दिल्ली येथील जिल्हा न्यायालयांमध्ये आणि नंतर दिल्लीच्या उच्च न्यायालयात आणि घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष कर आकारणी, लवाद अशा विविध क्षेत्रातील न्यायाधिकरणांमध्ये सराव केला. व्यावसायिक कायदा, कंपनी कायदा, जमीन कायदा, पर्यावरण कायदा आणि वैद्यकीय निष्काळजीपणा कायद्यांवर त्यांचे उत्कृष्ट प्रभुत्व आहे. प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ स्थायी वकील म्हणून त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ होता. 2004 मध्ये त्यांची दिल्लीसाठी स्थायी वकील (सिव्हिल) म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील आणि अॅमिकस क्मयुरी म्हणून अनेक फौजदारी खटल्यांमध्ये हजेरी लावत युक्तिवाद केला होता.
2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात बढती
2005 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली. 2006 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांनी दिल्ली न्यायिक अकादमी, केंद्रीय आणि जिल्हा न्यायालय लवाद केंद्र, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवादाचे अध्यक्ष/न्यायाधीशपदही भूषवले होते.
2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती
8 जानेवारी 2019 रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपद भूषवले. ते सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत. आता संजीव खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत.
अनेक मोठ्या निवाड्यांमध्ये सहभाग
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी जानेवारी 2019 मध्ये त्यांची नियुक्ती झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात अनेक उल्लेखनीय निकाल दिले आहेत. यामध्ये व्हीव्हीपॅट पडताळणी, निवडणूक बाँड योजना, कलम 370 हटवण्याचे प्रकरण, कलम 142 अंतर्गत घटस्फोटाचे प्रकरण, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन आणि आरटीआय निर्णयाचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल.