गोसावी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या
राधानगरी तालुका गोसावी समाजाची मोर्चानी मागणी, तहसीलदार यांना निवेदन
कोल्हापूर
राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृण खुना करणाऱ्या आरोपीवर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राधानगरी तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना अखिल भारतीय गोसावी समाज राधानगरी तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राजगुरुनगर जि.पुणे या ठिकाणी बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी भटके गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून निघृण हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील गोसावी समाजाच्या वतीने राधानगरी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला
राजगुरुनगर, जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तव्यास आले आहे. पीडित कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय अजय दास या नराधमांनी दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांची निघृण हत्या केलेली आहे. सदर घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने सदर आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबास मुख्यमंत्रीसहायता निधीतुन कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत मिळावी व पीडित कुटुंबास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राधानगरी तालुका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चव्हाण व बहुजन मुक्ती पार्टी या संघटनेने या मोर्चाला पाठिंबा दिला.
यावेळी मनसेचे राजेंद्र चव्हाण, काळुराम गोसावी, प्रकाश गोसावी, हिंदुराव गोसावी, भीमराव गोसावी, रामचंद्र गोसावी, शंकर गोसावी, सचिन गोसावी यांच्यासह गोसावी समाजाच्या महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या