मोगरा फुलला...चाफा बोलेना
कोल्हापूर :
‘मी रात टाकली, चाफा बोलेना, मोगरा फुलला, छडी लागे छम छम, गोमू माहेराला जाते अशा 19 गीतांच्या सादरीकरणाने गायकांनी रसिकांची मने जिंकली. मराठी गाणी रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेवून गेली. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत गायकांबरोबर गाण्याचे बोल गुणगुणले. मंजुळ आवाजात गायलेल्या गाण्यांनी उत्तरोउत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.
स्वरसंगीत प्रस्तुत प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमांतर्गत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने गीतकारांच्या निवडक गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कारण होते दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित संगीत महोत्सव व राज्यस्तरीय भावगीत व नाट्यागीत स्पर्धा.
गायकांनी गीतकार सुरेश भट, मंगेश पाडगावकर, बाल कवी, प्र. के अत्रे, ना .धो महानोर, गदिमा, कुसुमाग्रज, शांता शेळके, जगदीश खेबुडकर, संत एकनाथ आदी गीतकारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तबला प्रशांत देसाई व संदेश खेडेकर, हार्मोनियम अमित साळोखे, की बोर्ड शिवाजी सतार, व्हायोलिन व सतार केदार गुळवणी, ढोलक व ढोलकी अजित पाटील, ऑक्टो पॅड गुरु ढोले यांनी साथसंगत केली. मनीष आपटे यांनी निवेदन केले. यावेळी संस्थेचे सल्लागार व मंचाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, अनिल लोहिया, नितीन वाडीकर, सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य एस .एस. चव्हाण, प्रा. सतीश कुलकर्णी, प्रा. गोविंद पैठणे आदी उपस्थित होते.
भावगीत व नाट्यागीत स्पर्धेचा निकाल
राज्यस्तरीय भावगीत व नाट्यागीत स्पर्धेत 15 ते 35 वयोगटातील 56 पुरुष व महिला स्पर्धकांनी भाग घेतला. भावगीत स्पर्धेत शर्वरी कुलकर्णी (कोल्हापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पियुशा कुलकर्णी (कोल्हापूर) द्वितीय क्रमांक तर श्रद्धा जोशी (पुणे) तृतीय क्रमांक मिळवला. तसेच उत्तेजनार्थ बक्षिस अक्षय जांभळे व मानसी समुद्रे यांना देण्यात आले. नाट्यागीत स्पर्धेत सानिया मुंगारे (चंदगड) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. श्रुती बोकील (सांगली) यांनी व्दितीय तर समिता सांभारे(सांगली) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ बक्षिस पियुशा कुलकर्णी व वैष्णवी कोपरकर यांना देण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. रंजन कुलकर्णी, डॉ. विनोद ठाकुर-देसाई यांनी काम पाहिले.
आजचे कार्यक्रम
आज (दि. 12) सकाळी 9 वाजता 36 ते 55 वयोगटासाठी भावगीत स्पर्धा होतील. सायंकाळी 6 वाजता ‘स्वर शिल्प’ कार्यक्रमांतर्गत गायक ऋषिकेश रानडे व मधुरा दातार यांचा जुन्या हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम होईल.