For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाभोलकरांना न्याय ! पानसरे-कलबुर्गी-लंकेश अद्याप प्रतिक्षेत

06:29 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
दाभोलकरांना न्याय   पानसरे कलबुर्गी लंकेश अद्याप प्रतिक्षेत
Advertisement

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली अन् दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळाला. तत्कालीन राज्य एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने दाभोलकर यांच्या मारेकऱ्याविरोधात साक्षी-पुरावे गोळा करीत सीबीआयला दिले. याच साक्षी-पुराव्याच्या आधारावर दाभोलकरांना न्याय मिळाला. मात्र डॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

Advertisement

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांना अखेर तब्बल 11 वर्षांनी न्याय मिळाला. त्यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, ज्यांच्यावर कटाचा आरोपा होता तो वीरेंद्र तावडे पुराव्यांअभावी निर्दोष सुटला आहे. तसेच अन्य दोन आरोपींचीसुद्धा निर्दोष सुटका झाली आहे. या निकालानंतर दाभोलकर कुटुंबियांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असले, तरी निर्दोष सुटलेल्या तीन आरोपींविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी त्यांनी सुऊ केली आहे. अत्यंत खडतर तपासाअंती तपास यंत्रणांना दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आले. केवळ अटकच नाही तर तत्कालीन राज्य एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मारेकऱ्यांना अटक करीत त्यांच्या विरोधात भक्कम साक्षी पुरावे गोळा करीत ते सीबीआयकडे सुपुर्त केले होते. नेमके हेच साक्षी-पुरावे सीबीआयने न्यायालयात हजर केले होते. याव्यतिरिक्त काही एक साक्षी-पुरावे सीबीआयकडे नव्हते. त्याआधारे न्यायालयाने दोघांना शिक्षा ठोठावली. केवळ अतुलचंद्र कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने घेतलेल्या अथक परिश्रमाअंती हा निकाल लागल्याने संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आज जरी अतुलचंद्र कुलकर्णी हे सेवानिवृत्त असले तरी त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्यगुणांचा उपयोग केंद्र तसेच राज्य सरकारला भविष्यात होऊ शकतो. या निकालाचे बक्षिस कुलकर्णी तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळावे. कारण हा त्यांचा अधिकार आहे. हे झाले दाभोलकर यांच्याबाबतीत. मात्र कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट फिरत आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या घडल्यानंतर ज्या पद्धतीने गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यामध्ये एकच विचारधारा आणि समान दुवा असल्याचा पोलिसांचा कयास आहे. मात्र, तपास अजूनही म्हणावा तितक्या वेगाने पुढे सरकला नाही. दाभोलकर तपासात तर कोणालाही कसलाही मेळ नव्हता. तपास करणारी राज्य एटीएस, सीबीआय या तपास यंत्रणा अंधारात घुटमुळत होत्या. नेमके अशावेळी राज्य एटीएसची धुरा हाती आलेल्या अतुलचंद्र कुलकर्णी यांनी त्यांचे काम सुऊ केले. अशावेळी एक-एक कडी जोडत असतानाच एटीएसने शरद कळसकर याला अटक केली. त्याच्या चौकशीतून दाभोलकर हत्येचे मारेकरी पुढे आले. यावेळी एटीएसने सीबीआयला माहिती देत जोरदार कारवाई करीत अनेक साक्षी-पुरावे गोळा केले. नेमके याच साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दाभोलकर हत्येचा निकाल दिला.

Advertisement

तर दुसरीकडे गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ज्या पद्धतीने दाभोलकरांची हत्या झाली त्याच पद्धतीने ही हत्या झाली होती. यानंतर अवघ्या चार महिन्यांमध्येच 2015 मध्येच ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे दाभोलकरांपासून ते गौरी लंकेश यांच्या हत्येपर्यंत एकच समान धागा आणि हत्या करण्याची पद्धत दिसून आली आहे. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील सहा आरोपी बंगळूरमध्ये कैद आहेत, तर चार आरोपी पुण्यामध्ये कैद आहेत. पानसरे हत्या प्रकरणात आतापर्यंत एसआयटीकडून 42 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. हा खटला उभारण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले शस्त्र मात्र अजूनही सापडले नाही. ज्या शस्त्राने पानसरे यांच्यावरती गोळी झाडण्यात आली, ते शस्त्र अजूनही सापडलेले नाही. ज्यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे ते दोन मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांनी वापरलेली गाडीसुद्धा हाताला लागलेली नाही. 9 मे रोजी कोल्हापुरात झालेल्या सुनावणीत तावडेविरोधात भक्कम पुरावे असल्याने जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे जामीन रद्द व्हावा, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला होता.

गोविंद पानसरे यांच्या खुनाचा कट, बेळगावातून शस्त्र उपलब्ध करणे, मारेकऱ्यांना प्रशिक्षण, कोल्हापूर, बेळगावसह विविध ठिकाणी राहण्याची सोय करणे, गुह्यात वापरण्यासाठी दुचाकीची खरेदी करण्यात तावडेचा सहभाग होता. विशेष म्हणजे नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातही वीरेंद्र तावडेचा समावेश होता. मात्र, सबळ पुरावा नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. तावडेने बेळगावातून चोरीतील दुचाकी 10 हजारामध्ये खरेदी केली होती. तीच लाल रंगाची दुचाकी मारेक़ऱ्यांनी पानसरे यांच्या खुनात वापरली होती. तावडेने बेळगावातून आणलेले शस्त्र मारेकऱ्यांना पुरवले होते. गुह्यानंतर त्यानेच शस्त्राची विल्हेवाट लावली होती. कर्नाटकातील एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात अटक असलेले शरद कळसकर तसेच वासुदेव सूर्यवंशीच्या जबाबात तावडेची कुंडली बाहेर आली. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी मोहन नायकला कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एस विश्वजीत शेट्टी यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने एक लाख ऊपयांच्या वैयक्तिक जामीन मंजूर केला आहे. मोहन नायक या प्रकरणातील पहिले आरोपी असून, त्याला जामीन मिळाला आहे.

आरोपी नायक गेल्या पाच वर्षांपासून म्हणजेच 2018 पासून पोलिसांच्या ताब्यात होता. सुनावणीला दिरंगाई झाल्याने जामिनासाठी अर्ज केला होता. कर्नाटक हायकोर्टाने सांगितले की, आरोपी 18 जुलै 2018 पासून कोठडीत आहे. तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकू शकत नाही. आरोपीचे जबाब नोंदवून तो पाच वर्षे पोलिस कोठडीत राहिला. खटल्याला विलंब होत असल्याच्या कारणावरून जामिनासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने सांगितले की, केवळ 90 जणांची चौकशी झाली आहे. तर दुसरीकडे तपास यंत्रणा देखील याचा तपास करीत आहेत.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.