For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हणे आम्हाला विचारूनच परवानगी द्या!

09:48 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
म्हणे आम्हाला विचारूनच परवानगी द्या
Advertisement

भाजपच्या नगरसेवकाच्या अर्जामुळे सभागृहात गोंधळ : सारवासारव करण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : आपल्या प्रभागामध्ये कोणीही इमारत बांधत असेल तर नगरसेवकांना विचारूनच परवानगी द्या, असा अर्ज भाजपच्या नगरसेवकाने अधिकाऱ्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये यावरून मोठा गोंधळ उडाला. तब्बल दोन तास यावर चर्चा झाली. सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी गटाच्या नगरसेवकांनी याबद्दल सत्ताधारी गटाला चांगलेच कोंडीत पकडले. या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न अनेकांनी केल्याचे दिसून आले. वॉर्ड क्र. 32 चे नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत अर्ज दिला होता. तो अर्ज विरोधी गटाच्या नगरसेवकांना मिळाला. त्याबाबत नगरसेवकांनी कायदा सल्लागारांना विचारणा केली. त्यावर नगरसेवकांना अशा प्रकारचा कोणताच अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. यावेळी सत्ताधारी गटाची चांगलीच कोंडी झाली. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी अशा प्रकारे अर्ज करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. प्रारंभी नगरसेवक अभिजित जवळकर मारहाण प्रकरणावर बराच उशीर चर्चा करण्यात आली. त्यानंतर या विषयावर चर्चा झाल्याने सभागृहाचा  संपूर्ण वेळ वाया गेला. शहराच्या विकासाबाबत एक शब्दही निघाला नाही. त्यामुळे विरोधी गटाच्या नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

केवळ राजकारण करू नका

Advertisement

आमदार राजू सेठ यांनी आम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिले आहे? याचा नगरसेवकांनी विचार करावा. केवळ राजकारण करून वेळ वाया घालवू नका, असे आवाहन त्यांनी केले. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करा आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच मारहाण प्रकरण आणि नगरसेवकाने केलेल्या अर्जावरून बराच उशीर गोंधळ उडाला होता. कोणाचाच ताळमेळ कोणाला नव्हता. असा प्रकार या सभेत पुन्हा एकदा दिसून आला. यावेळी अधिकाऱ्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी, नगरसेवक अजिम पटवेगार, नगरसेवक रवी साळुंखे, शाहीद पठाण, रियाज किल्लेदार यांनी जोरदार आक्षेप नोंदविला होता.

सभागृहात महापौरांचा वारंवार अवमान : सत्ताधारी गटातील नगरसेवकच अनभिज्ञ

सभागृह कशा प्रकारे चालविले पाहिजे, शिस्त कशी पाळली पाहिजे, महापौरांच्या परवानगीशिवाय नगरसेवकांनी उठून प्रश्न विचारणे किंवा उत्तरे देणे हा देखील अवमान असतो. मात्र सत्ताधारी गटातील अतिउत्साही आणि आपणच अनुभवी असल्याचा आव आणत सभा सुरू असताना अचानकपणे उठून उत्तरे दिली जात होती. त्यामुळे महापौर शोभा सोमणाचे यांचा वारंवार अवमान झाल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांनी सभागृहामध्ये कशी शिस्त पाळली पाहिजे, याची माहिती दिली. त्यानंतर काहीवेळातच त्या शिस्तीचा भंग नगरसेवकांनी केला. विरोध हा झाला पाहिजे. तसेच कोणत्याही प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. मात्र ती शिस्तबद्धरित्या होणे महत्त्वाचे आहे. अचानकपणे उठायचे आणि आपणच प्रश्नाचे उत्तर द्यायचे, असा प्रकार सत्ताधारी गटातील नगरसेवक करत होते. त्यामुळे काहीजणांना अनुभव असूनही त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे पुन्हा एकदा सभागृहात दिसून आले.

सभागृह चालविणेदेखील कला असते. महापौरांना आदराने विचारून प्रथम परवानगी घेतली पाहिजे. त्यानंतर त्यावर महापौरांशीच चर्चा केली पाहिजे. थेट विरोधक किंवा इतर नगरसेवकांच्या प्रश्नाला उत्तर देणे हे चुकीचे असते. मात्र जसे काही मलाच सर्व माहिती आहे, अशा अविर्भावात नगरसेवकांनी उत्तरे दिल्याने सभागृहाचा अवमान होत असल्याचे दिसून आले. शहरातील समस्या सोडविण्याचा तर पत्ताच नाही. मात्र केवळ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करणे व राजकारण या व्यतिरिक्त सध्याच्या महापालिकेच्या सभागृहामध्ये काहीच कामकाज चालत नसल्याचे दिसून येत आहे. मागील बैठकीत फाईल गायब प्रकरणावरून गोंधळ उडाला होता. त्यानंतर आता नगरसेवकाला मारहाणीच्या प्रकरणावरून दुपारपर्यंत गोंधळ उडाला. सभागृहाचे कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून आले. कायदा सल्लागारांनी सांगूनही नगरसेवकांना आवर घातला नाही, याबद्दल नाराजी व्यक्त होत होती.

Advertisement
Tags :

.