कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषक आजपासून
वृत्तसंस्था/ सांतियागो, चिली
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ सांतियागो येथे आयोजित करण्यात आलेल्या एफआयच कनिष्ठ महिला विश्वचषक स्पर्धा, 2025 मध्ये आपल्या मोहिमेची सुऊवात करण्यास सज्ज झाला आहे. आज 1 डिसेंबर रोजी चिलीतील एस्टॅडिओ नॅसिओनाल येथील सेंट्रो डेपोर्टिव्हो डे हॉकी सेस्पेड येथे हा सामना होणार आहे.
कर्णधार ज्योती सिंगच्या नेतृत्वाखालील भारताचा पहिला सामना नामिबियाशी होईल. दोन्ही संघ अलीकडच्या कोणत्याही एफआयएच मान्य स्पर्धेत आमनेसामने आलेले नाहीत, त्यामुळे हा सामना रंजक ठरणार आहे. कारण भारत या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेतील सुऊवातीच्या तणावांवर मात करण्याचा प्रयत्न करेल. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि स्पर्धेपूर्वी तयारी व्यवस्थित करण्यासाठी संघ एक आठवडा आधीच सांतियागो येथे पोहोचला होता. ही आवृत्ती ऐतिहासिक आहे, कारण या स्पर्धेत पहिल्यांदाच 24 संघांचा समावेश आहे. 2023 पर्यंत 16 संघांचा या स्पर्धेत समावेश असायचा. त्याचा आता विस्तार करण्यात आला आहे.
24 संघांची वाटणी सहा गटांमध्ये करण्यात आली आहे. गट ‘अ’मध्ये यजमान चिलीसह जपान, मलेशिया आणि नेदरलँड्स आहेत. गट ‘ब’मध्ये अर्जेंटिना, बेल्जियम, वेल्स आणि झिम्बाब्वे आहेत, तर गट ‘क’मध्ये जर्मनी, भारत, आयर्लंड आणि नामिबिया आहेत. गट ‘ड’मध्ये ऑस्ट्रिया, चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका, तर गट ‘ई’मध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्कॉटलंड आणि स्पेन आणि गट ‘फ’मध्ये न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक, अमेरिका आणि उऊग्वे यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा सामना बुधवार, 3 डिसेंबर रोजी जर्मनीशी होईल. त्यानंतर शुक्रवार 5 डिसेंबर रोजी आयर्लंडविरुद्ध त्यांचा शेवटच्या गट सामना होईल. कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकात भारताचा हा सातवा सहभाग आहे. 2013 मध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी नोंदली गेली होती, जेव्हा संघाने इंग्लंडला रोमांचक पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत करून कांस्यपदक जिंकले होते.