कनिष्ठ महिला हॉकी संघाचे मस्कतला प्रयाण
कनिष्ठ महिला आशिया चषक हॉकी : रविवारी सलामीची लढत बांगलादेशविरुद्ध
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी मस्कतला रवाना झाला. भारतीय संघ विद्यमान विजेता असून जेतेपद स्वत:कडेच राखण्याचा आणि पुढील वर्षी होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा ज्योती सिंगच्या नेतृत्वाखालील संघ प्रयत्न करणार आहे. कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धा 7 ते 15 डिसेंबर या कालावधीत होत असून भारताची सलामीची लढत रविवारी बांगलादेशविरुद्ध होईल. स्पर्धेत पहिले तीन स्थान मिळविणारे संघ कनिष्ठ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. ही स्पर्धा चिलीतील सांतियागो येथे होणार आहे. येथील स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून चीन, मलेशिया, थायलंड, बांगलादेशही याच गटात आहेत तर ब गटात दक्षिण कोरिया, जपान, चिनी तैपेई, हाँगकाँग, लंका यांचा समावेश आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व ज्योती सिंग करीत असून साक्षी राणा उपकर्णधार आहे. वैष्णवी विठ्ठल फाळके, सुनेलिता टोपो, मुमताज खान, दीपिका, ब्युटी डुंगडुंग या वरिष्ठ संघातून खेळलेले काही खेळाडू भारतीय कनिष्ठ संघात आहेत. भारताचे माजी कर्णधार तुषार खांडेकर हे या संघाचे प्रशिक्षक आहेत. गेल्या वर्षी भारताने दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव करून पहिल्यांदाच जेतेपद पटकावले होते. ‘आमच्या मोहिमेबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास असून आपल्याकडे एक उत्तम व अनुभवी संघ आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही कठोर मेहनत घेतली असल्याने मस्कतमधील स्पर्धेत आपली क्षमता दाखविण्यास आम्ही उत्सुक झालो आहोत,’ असे कर्णधार ज्योती सिंग मस्कतला प्रयाण करण्यापूर्वी म्हणाली. ‘आपल्या पुरुष हॉकी संघाने बाद फेरी गाठल्याचा आम्हाला आनंद झाला असून ते जेतेपदाकडे वाटचाल करीत आहेत. आम्ही त्यांचे सर्व सामने पाहत असून उर्वरित सामन्यात त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आम्हीही तेथे उपस्थित राहणार आहोत,’ असे उपकर्णधार साक्षी राणा म्हणाली. पुरुषांची हॉकी स्पर्धाही सध्या मस्कतमध्ये सुरू असून भारताने उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ : गोलरक्षक-निधी व अदिती. बचावपटू-मनीषा, ज्योती सिंग (कर्णधार), लालथंतलुआंगी, पूजा साहू, ममता ओरम. मध्यफळी-वैष्णवी विठ्ठल फाळके, सुनेलिता टोपो, इशिका, रजनी करकेटा, साक्षी राणा (उपकर्णधार), खैदेम शिलीमा चानू,. आघाडी फळी-दीपिका, ब्युटी डुंगडुंग, कनिका सिवाच, मुमताज खान, लालरिनपुई. राखीव : बिनिमा धान, हिमांशी शरद गावंडे. प्रशिक्षक- तुषार देशपांडे.