कनिष्ठ हॉकी विश्वचषक : भारताचा सामना आज स्वित्झर्लंडशी
वृत्तसंस्था/ मदुराई
येथे आज मंगळवारी होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ पुऊष हॉकी विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीपूर्वी स्वित्झर्लंडविऊद्धच्या अंतिम गट सामन्यात विजयी घोडदौड सुरू ठेवताना फॉर्ममध्ये असलेला, पण अद्याप कसोटी न लागलेला भारतीय संघ आपले कच्चे दुवे सुधारण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि स्वित्झर्लंड हे दोन्ही संघ गट ‘ब’मध्ये अपराजित आहेत आणि त्यांनी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे.
परंतु यजमान संघ गोलफरकाच्या आधारे गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीयांनी गोलांचा वर्षाव केला. त्यांनी चिलीवर 7-0 ने मात केली आणि नंतर ओमानवर 17-0 ने मात केली. दुसरीकडे, स्वित्झर्लंडने ओमानवर 4-0 ने मात केली आणि नंतर चिलीवर 3-2 असा विजय मिळवला. मंगळवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा संघ असलेला भारत स्वित्झर्लंडवर आरामात मात करेल अशी अपेक्षा आहे. परंतु बाद फेरीपूर्वी भारतासाठी काही चिंता कायम आहेत
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय बचावफळीची फारशी कसोटी लागली नाही गोलरक्षक प्रिन्स दीप सिंग आणि बिक्रमजित सिंग यांना फारशी चिंता जाणवली नाही. कर्णधार रोहितच्या नेतृत्वाखालील बचावफळीला स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात अधिक सक्रिय व्हावे लागेल. भारतासाठी आणखी एक चिंतेचा विषय म्हणजे पेनल्टी कॉर्नरवरील ड्रॅगफ्लिकचे गोलमध्ये रूपांतर करण्याच्या बाबतीत येणारे अपयश हा आहे.
संघाचा मुख्य ड्रॅगफ्लिकर कर्णधार रोहित नेहमीसारखा सुरात दिसलेला नाही आणि त्याने त्याचा खेळ सुधारण्याची आवश्यकता आहे. असे नाही की, भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल केले नाहीत. परंतु बहुतेक गोल अप्रत्यक्षरीत्या आणि आदळून आलेल्या चेंडूवर झालेले आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या कामगिरीचा सर्वांत आनंददायी पैलू म्हणजे त्यांच्या मधल्या आणि आघाडीफळीची कामगिरी राहिलेली आहे.
दिलराज सिंग हा सहा गोलांसह स्पर्धेतील संयुक्तरीत्या सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्यात ओमानविऊद्ध हॅटट्रिकचा समावेश आहे. अर्शदीप सिंगनेही गेल्या सामन्यात तीन गोल केले आहेत. मनमीत सिंग, अजित यादव आणि इंगलेम्बा लुवांग थौराजम यासारखे खेळाडूही गोल करण्यात यशस्वी झाले आहेत. उर्वरित मोहिमेसाठी चेन्नईला परतण्यापूर्वी स्वित्झर्लंडविऊद्धचा सामना हा मदुराईमध्ये भारताचा एकमेव सामना आहे. भारतीय संघ येथील परिस्थितीशी कसा जुळवून घेतो हे पाहावे लागेल.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या इतर सामन्यांमध्ये स्पेन मदुराईमध्ये नामिबियाशी खेळेल, बेल्जियम इजिप्तशी (मदुराई), चिली ओमानशी (चेन्नई), नेदरलँड्स ऑस्ट्रियाशी (मदुराई), फ्रान्स बांगलादेशशी (चेन्नई), इंग्लंड मलेशियाशी (मदुराई) आणि ऑस्ट्रेलिया कोरियाशी (चेन्नई) खेळेल.