राजद आल्यास ‘जंगलराज’ निश्चित
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत मतदारांनी अत्यंत सावधपणे आणि परिणामांचा विचार करुन मतदान करण्याची आवश्यकता आहे. कारण, थोडीशीही चूक झाली आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वातील सरकार राज्यात आले. तर 2005 पूर्वीचे ‘जंगलराज’ पुन्हा अस्तित्वात येईल, असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी दिला आहे. ते एका प्रचारसभेत भाषण करत होते.
बिहारमधील कुख्यात ‘बाहुबली’ आणि समाजकंटक मोहम्मद शहाबुद्दीन याचा पुत्र ओसामा शाहाब याला राष्ट्रीय जनता दलाने उमेदवारी दिली आहे. 1990 ते 2005 या 10 वर्षांच्या काळात याच मोहम्मद शहाबुद्दीन याने बिहारमध्ये धुमाकूळ घातला होता. अनेक जणांच्या क्रूर हत्या केल्या होत्या. सर्वसामान्य लोकांवर अत्याचार केले होते. तथापि, त्या काळात राज्यात सत्तेवर असणाऱ्या लालू प्रसाद यादव आणि नंतर राबडी देवी यांच्या सरकारांनी या हिंसाचाराकडे आणि गुन्हेगारीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते. त्याच पंधरा वर्षांच्या काळात या राज्यात हिंसाचार, गुंडगिरी, महिलांवरील अत्याचार आणि खंडणी वसुली यांना ऊत आला होता. त्यावेळच्या राज्य सरकारच्या आशीर्वादाने हे सर्व घडत होते. या राज्यातील लोक ते ‘काळे युग’ विसरलेले नाहीत. तो काळ पुन्हा न आणण्याइतका सूज्ञापणा बिहारचा मतदार दाखवणार आहे, असा आम्हाला विश्वास असून या विधानसभा निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर येईल, असे प्रतिपादन न•ा यांनी भाषणात केले आहे.
गेल्या 20 वर्षांमध्ये मोठा विकास
बिहारच्या जनतेने लालू यादव यांच्या भ्रष्टाचारी आणि क्रूर राजवटीला वैतागून 2005 मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन केले. तेव्हापासूनच्या 20 वर्षांमध्ये राज्यात विकासाचे कार्य मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यात शांतता नांदत असून सामुहिक गुन्हेगारीला आळा बसला आहे. राज्याच्या कृषीक्षेत्राचाही विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. नवे उद्योग राज्यात यावेत म्हणून पायाभूत सुविधा विकास करण्यावर भर गेल्या 20 वर्षांमध्ये देण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून आज राज्यात नवे उद्योग येत आहेत. विकासाची ही मालिका खंडित होता कामा नये. तसे झाल्यास राज्य पुन्हा 20 वर्षे मागे जाईल, असा इशाराही न•ा यांनी दिला. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मतदानाचा प्रथम टप्पा येत्या गुरुवारी, अर्थात 6 नोव्हेंबर या दिवशी आहे.
कुटुंबासाठी कधीच काही नाही केले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या मतदारांना भावोत्कट आवाहन केले आहे. मी गेली जवळपास 20 वर्षे या राज्याचा मुख्यमंत्री आहे. या काळात आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केवळ राज्याच्या विकासाचे ध्येय ठेवले. आम्ही जनतेसाठी आमचे सर्वस्व पणाला लावले. जे काही केले, ते केवळ सर्वसामान्य आणि गरीब जनतेसाठीच केले. सत्तेचा आधार घेऊन आम्ही कधीच आमच्या कुटुंबाचा लाभ करुन दिला नाही. मतदार ही बाब मतदान करताना ध्यानात ठेवतील, असा मला विश्वास वाटतो. याही निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच विजयी होईल, हे निश्चित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.