हिमालयावरुन मारली उडी
गिनीज जागतिक विक्रम पुस्तिकेत एका नव्या विक्रमाची नोंद नुकतीच झाली आहे. हा विक्रम ‘स्काय बेस जंप’ या प्रकारातील आहे. ब्रिटीश गिर्यारोहक जोशुआ ब्रेगमॅन याने हिमालयातील ‘मीरा’ या पर्वशिखरावरुन खाली उडी मारुन हा विक्रम केला. या पर्वतशिखराची उंची समुद्रसपाटीपासून 18 हजार 753 फूट आहे.
अर्थात, ब्रेगमॅन यांनी ही उडी तशीच मारलेली नव्हती. तर पॅरेशूटच्या साहाय्याने मारलेली होती. त्यामुळे एवढ्या उंचावरुन उडी मारुनही ते अलगदपणे खाली उतरले. ब्रेगमॅन यांच्यापूर्वी पॅरेशूटच्या साहाय्याने उडी मारण्याचा विक्रम मथायस गिरोड यांच्या नावे होता. तो त्यांनी 2019 मध्ये केला होता. त्यांनी 14 हजार 301 फूट अंतरावरुन उडी मारली होती. स्काय बेस जंपिंग हा खेळ आता चांगलाच लोकप्रिय होऊ लागला आहे. या खेळाला उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने या खेळातील सुरक्षितता वाढली आहे. परिणामी. अनेक हौशी पर्यटक यात भाग घेऊ लागले आहेत. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर नवे नवे विक्रम होत असून जुने झपाट्याने मोडले जात आहेत. अलिकडच्या काळात गिर्यारोहणाच्या प्रमाणात वाढ झाल्याने भारतासह जगातील बऱ्याच पर्वतशिखरांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा तेथून खाली आणण्याचे आणि त्यायोगे पर्वतशिखरे स्वच्छ करण्याचे कामही स्काय बेस जंपिंगच्या माध्यमातून केले जात आहे. एकंदरीत हा खेळ आता सामाजिक कार्याचा भागही बनलेला आहे.