जुलियन असांजे अखेर मुक्त
अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करण्याचे कृत्य : 12 वर्षे होता कैदेत
वृत्तसंस्था/ लंडन
अमेरिकेची गोपनीय माहिती उघड केल्याच्या आरोपांप्रकरणी तुरुंगात कैद विकीलीक्सचा संस्थापक जुलियन असांजे यांची मंगळवारी 5 वर्षांनी लंडनच्या तुरुंगातून मुक्तता झाली आहे. अमेरिकेच्या प्रशासनासोबत केलेल्या एका कराराच्या अंतर्गत असांजे यांनी हेरगिरीची बाब मान्य केली आहे.
52 वर्षीय असांजे यांनी अमेरिकेसोबत एक करार केला आहे. याच्या अंतर्गत ते बुधवारी अमेरिकेच्या साइपन न्यायालयासमोर हजर राहतील. तेथे ते अमेरिकेच्या गोपनीय दस्तऐवजांना प्राप्त करण्यासाठी कट रचल्याचा आरोप मान्य करतील. आरोप मान्य केल्यावर असांजे यांना 62 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात येईल. परंतु ही शिक्षा त्यांनी यापूर्वीच पूर्ण केली आहे. जुलियन यांनी आतापर्यंत ब्रिटनच्या तुरुंगात 1901 दिवस शिक्षा भोगली आहे. अमेरिकेसोबत करण्यात आलेल्या करारानंतर त्यांना ब्रिटनच्या बेलमार्श तुरुंगातून मुक्त करण्यात आले. तेथून ते ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत. करार झाल्यावर विकीलीक्सने सोशल मीडियावर पोस्ट करत असांजे यांच्या मुक्ततेची माहिती दिली.
अमेरिकेकडून हेरगिरीचे आरोप
ऑस्ट्रेलियन नागरिक असांजे यांनी 2010-11 मध्ये हजारो गोपनीय दस्तऐवजांना सार्वजनिक केले होते. यात अफगाणिस्तान आणि इराक युद्धाशी निगडित दस्तऐवजही सामील होते. यामुळे अमेरिका, ब्रिटन आणि नाटोच्या सैन्यावर युद्धगुन्ह्यांचा आरोप झाला होता. यात बलात्कार, छळ आणि शरणागती पत्करलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचा आरोप सामील होता. विकीलीक्सच्या खुलाशानंतर अमेरिकेने असांजे यांनी हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. गोपनीय फाइल्स सार्वजनिक करत अनेक लोकांचे जीवन धोक्यात आणल्याचा आरोप असांजे यांच्यावर ठेवण्यात आला होता.
7 वर्षापर्यंत दूतावासात वास्तव्य
असांजे यांना 2010 मध्ये स्वीडनच्या मागणीनुसार लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. स्वीडनच्या दोन महिलांनी असांजे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तर असांजे यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले होते. स्वीडनला प्रत्यार्पण केले जाण्यापूर्वी असांजे यांनी 2012 मध्ये लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय मिळविला होता. याद्वारे त्यांनी अटकेची कारवाई टाळली होती. 2012-19 पर्यंत ते इक्वेडोरच्या दूतावासातच राहिले. 7 वर्षांपर्यंत त्यांनी दूतावासाबाहेर एक पाऊलही टाकले नव्हते. 2019 मध्ये दूतावासाबाहेर पडल्यावर असांजे यांना ब्रिटनच्या पोलिसांनी अटक केली होती.