न्यायाधीश हे काही राजपुत्र नव्हेत!
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे वक्तव्य : ब्राझीलमध्ये जे-20 परिषदेचे आयोजन
वृत्तसंस्था/ रियो डी जेनेरियो
न्यायाधीश हे काही राजपुत्र किंवा सार्वभौम नाहीत, त्यांचे काम सेवा देणे असते असे वक्तव्य सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी केले आहे. ब्राझीलमधील जे-20 शिखर परिषदेला त्यांनी संबोधित केले आहे. न्यायाधीश एक असा पदाधिकारी असतो, जो अवमानासाठी दोषीला दंड करतो आणि इतरांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतो, याचमुळे निर्णय घेण्याची त्याची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी भारतीय पत्रकारांचे कौतुक केले आहे. चुकीची माहिती रोखणे आणि कायदेशीर कार्यवाहीच्या अचूक वृत्तांना समोर आणण्यात भारताचे पत्रकार प्रभावी भूमिका बजावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निर्णय घेण्याचा मार्ग पारदर्शक असणे आवश्यक आहे. आम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर बोलत आहोत. परंतु एआयच्या मदतीने निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. कुठलाही निर्णय का आणि कुठल्या आधारावर घेण्यात आला याचे स्पष्टीकरण असायला हवे असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी रियो डी जेनेरियो येथील जे-20 शिखर परिषदेत बोलताना म्हटले आहे.
न्यायाधीश हे काही राजपुत्र नाहीत, यामुळे ते कुठल्याही निर्णयासाठी स्पष्टीकरण देणे टाळू शकत नाहीत. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची त्याची जबाबदारी आहे. तसेच त्याच्याकडून घेतले जाणारे निर्णय कायद्याचे शिक्षण घेणारे आणि सर्वसामान्य लोकांसाठी समजण्याजोगे असावेत असे सरन्यायाधीश म्हणाले.
भारतीय न्यायालये सर्वसामान्यांवल निर्णय लादत नाहीत. तर लोकशाहीच्या पद्धतीने खटले निकाली काढतात. भारतीय लोकशाहीत पत्रकार न्यायालयीन निर्णयांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यास सक्षम राहिले असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.
तंत्रज्ञानाचा वापर
भारतीय न्यायालयांनी लोकशाहीच्या मूल्यांच्या स्थापनेसाठी संकटकाळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करत न्यायालयांना सर्वसुलभ केले आहे. तंत्रज्ञानाने न्याय आणि समाजामधील संबंध मूलभूत स्वरुपात बदलले आहेत. तंत्रज्ञान पूर्वी घेण्यात आलेले निर्णय देखील समोर ठेवू शकते. 7.5 लाखाहून अधिक प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली आहे. अनेक महत्त्वपूर्ण घटनात्मक प्रकरणांची सुनावणी युट्यूबवर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आल्याची माहिती सरन्यायाधीशांनी परिषदेदरम्यान दिली.
जे-20 म्हणजे काय?
जे-20 हा सर्वोच्च न्यायालय आणि घटनात्मक न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांचा गट असून याचे सदस्य जी-20 देश आहेत. यंदा जे-20 परिषदेचे आयोजन ब्राझिलियन फेडरल सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आले आहे. या परिषदेत आफ्रियन युनियन, अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय महासंघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्किये, ब्रिटन, पोर्तुगाल आणि स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख सामील झाले.