जेपीसीची बैठक, विरोधकांचा वॉकआउट
मागील बैठकीत तृणमूल खासदाराचे आक्षेपार्ह वर्तन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसद भवन परिसरात सोमवारी वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) बैठक पार पडली आहे. या बैठकीदरम्यान विरोधी पक्षांचे अनेक सदस्य बाहेर पडले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वॉकआउट करत दिल्ली वक्फ बोर्डाच्या सीईओच्या अहवालावर आक्षेप दर्शविला आहे.
या अहवालाबद्दल दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी जेपीसीच्या अध्यक्षांना यापूर्वीच पत्र लिहिले आहे. या अहवालाची दखल घेतली जाऊ नये असे त्यांनी पत्राद्वारे सांगितले असल्याचे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. अहवालात वक्फ संपत्तींवरून अनेक गैरप्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. जेपीसीसमोर हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमधील वक्फ बोर्डाशी संबंधित प्रतिनिधींकडून तोंडी साक्ष आणि सूचना मांडल्या जाणार आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी खासदार जगदंबिका पाल (वक्फ दुरुस्ती विधेयकाशी संबंधित संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष) यांना पत्र लिहून आयएएस अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडून सादर अहवाल अमान्य घोषित करण्याची मागणी केली आहे. कुमार यांनी जीएनसीटीडीच्या मंजुरीशिवया समितीला संबंधित अहवाल सादर केला होता.
यापूर्वी जेपीसीच्या मागील बैठकीत वादग्रस्त प्रकार घडला होता. बैठकीदरम्यान भाजप आणि तृणमूल खासदारादरम्यान झटापट झाली होती. यात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पाण्यासाठी ठेवलेला ग्लास टेबलावर आपटला होता, यात तेच जखमी झाले होते. यानंतर समितीतून कल्याण बॅनर्जी यांची हकालपट्टी करण्यात आली होती.