जोयडा ठरणार देशातील पहिला सेंद्रिय शेती करणारा तालुका
कृषीमंत्री चलुवराय स्वामी : आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते उपक्रमाला चालना
कारवार : जोयडा तालुक्यात पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करून संपूर्ण देशात हा तालुका सेंद्रीय शेती करणारा तालुका असे परिवर्तीत करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री चलुवराय स्वामी यांनी दिली. मंगळवारी कारवार जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी खाते, आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्र शिरसी यांच्या संयुक्त विद्यमाने जोयडा तालुक्याचे परिवर्तन सेंद्रीय शेतीकडे करणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष हल्याळ-जोयड्याचे आमदार आर. व्ही. देशपांडे, कृषी खात्याचे आयुक्त वाय. एस. पाटील, कृषी खात्याचे संचालक डॉ. जी. टी. पुत्र, जि. पं. चे उपसचिव प्रकाश हालमन्नवर, जोयडा ग्रा. पं. अध्यक्षा चंद्रिमा तुकाराम मिराशी, कृषी खात्याचे संयुक्त संचालक शिवप्रसाद गावकर, जीएसएस संस्थेच्या नम्रता आदी उपस्थित होते.
कृषीमंत्री पुढे म्हणाले, जोयडा तालुक्यात 70 टक्के अरण्य आहे. असे वातावरण इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही. नैसर्गिक संपत्तीने हा तालुका परिपूर्ण आहे. रासायनिक खताला फाटा देऊन सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या वापरातून बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले, तालुक्यात 2 हजार हेक्टरमध्ये भात, 60 हेक्टरमध्ये ऊस उत्पादन केले जात आहे. दरवर्षी 6 हजार किलो मध उत्पादन घेतले जाते. 6.7 टक्के रासायनिकांचा यासाठी वापर केला जातो. हे प्रमाण पूर्णपणे बंद करून सेंद्रीय शेतीसाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे, ही योजना यशस्वी करण्यासाठी सरकारने अनुदान मंजूर करावे, असे सांगितले. कार्यक्रमाला कृषी खात्याचे आयुक्त वाय. एस. पाटील, जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया, जोयडा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा पार्वती अगसर, उपाध्यक्षा लक्ष्मी वड्डर आदी उपस्थित होत्या.