पत्रकारांच्या कल्याणासाठी...!
सार्थक कोळेकर
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना महत्व आहे. पत्रकार नसतील तर आपल्याला बातम्या कशा समजतील ? फक्त एकदा कल्पना करुन बघा की आपले रोजचे वर्तमानपत्र जर कोरे छापून आले तर काय अशी कल्पनाही आपण करु शकत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत ठेवण्यासाठी शासन अनेक पावले उचलत आहे. पत्रकारांना सुरक्षा देण्यासह त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या विभागाच्या वतीने पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेक योजना व उपक्रम राबविले जात आहेत. यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी व अधिस्वीकृतीपत्रिका आदींच्या माध्यमातून पत्रकारांना अनेक सुविधा पुरविण्यात येत आहेत. याविषयीची थोडक्यात माहिती....
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना उतारवयात आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकार, संपादक अशा विविध पदांवर 30 वर्ष काम केल्याचा अनुभव तसेच वयाची किमान 60 वर्षे पूर्ण झालेले आणि सेवेतून निवृत्त झालेले असणे गरजेचे आहे. या योजनेतून निवृत्त पत्रकारास 11 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य दरमहा सन्मान वेतन म्हणून तर अधिस्वीकृतीपत्रिका धारक पत्रकारास निधन झाल्यावर एक लाख रुपये इतकी रक्कम दिली जाते.
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी
आधिस्वीकृती पत्रिकाधारक पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू आल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना एक ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पत्रकारांना अधिस्वीकृतीपत्रिकाधारक असणे गरजेचे आहे. या योजनेमधून हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग आदी आजारांसाठी 1 लाख रुपये इतकी कमाल आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर अपघाती भाजणे व पोट विकारांच्या आदी शस्त्रक्रियेसाठी 50 हजार रुपये इतकी आर्थिक रक्कम दिली जाते. या योजनांशिवाय अधिस्वीकृतीपत्रिकेचा लाभ पत्रकारांना दिला जातो. (अधिस्वीकृतीपत्रिका) ही वृत्तसंस्थांमध्ये कार्यरत असणारे पत्रकार, छायाचित्रकार, संपादकांना त्या वृत्तपत्रांच्या कोटानिहाय दिली जाते. तसेच वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या व 30 वर्ष पत्रकारितेचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांनाही अधिस्वीकृती पत्रिका दिली जाते. याशिवाय अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना संपूर्ण राज्यभर एसटीचा मोफत प्रवास ( वर्षाला 800 किलोमीटरपर्यंत) करता येतो.
महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेरील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि इतर सर्व प्रसार माध्यम संस्था यामध्ये वृत्तसंकलनाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अधिस्वीकृती पत्रिकेचे अर्ज या समित्यांसमोर सादर केले जातात. कागदपत्रांची पडताळणी करून योग्य त्या अभिप्रायसह हे अर्ज विभागीय आणि राज्य समितीसमोर सादर केले जातात व त्यावर निर्णय घेतला जातो.
जिल्हास्तरावर अधिस्वीकृतीपत्रिका मिळवण्यासाठी पात्रता
जिल्हा माहिती कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज कार्यरत असणाऱ्या वृत्तसंस्थेतून संपादकांची शिफारस व आवश्यक त्या कादगपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरुन जिल्हा माहिती कार्यालयात सादर करावा लागतो.
अधिस्वीकृतीसाठी आवश्यक कागदपत्रे- विहित नमुन्यातील अर्ज, वृत्तपत्राचे आरएनआय प्रमाणपत्र, जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडील केलेली डिक्लरेशची छायांकित प्रत, विहित नमुन्यातील खपाचा दाखला ब्रेकअपसह, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, नेमणूकपत्र किंवा करारपत्र विहित पध्दतीने, वेतनचिठ्ठी याप्रमाणे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार, छायाचित्रकारांना सुरक्षा व विविध लाभ देण्यासह त्यांच्या वृध्दापकाळात त्यांना आर्थिक सुरक्षितता देण्याचे कामही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येत आहे हे नक्कीच !.....