जोतिबाच्या सेवेत गुरव समाजाची सात कुटुंबे! जोतिबा रोडवरील जोतिर्लिंग मंदिरातील परंपरा
सहा वर्षानंतर एका कुटुंबाला मिळतो वर्षभर जोतिबाची पूजा करण्याचा मान
संग्राम काटकर कोल्हापूर
जोतिबा रोड हा शब्द जरी कानावर पडला तर जोतिबाचे मंदिर डोळ्यासमोर येते. जोतिबा हा बहुतेकांचा कुलदैवत असल्याने या मंदिराबाबत वेगळे वलय निर्माण झाले आहे. शहरासह आजूबाजूच्या गावांतील हजारो लोक जोतिबाच्या दर्शनासाठी मंदिरात दररोज येतात. त्यांचे अवभगत करण्याचे कार्य जोतिबाच्या सेवेतील तत्पर गुरव समाजातील पुजारी करताहेत. पुर्वापार असलेल्या परंपरेनुसार सात कुटुंबांकडे मंदिरातील जोतिबाच्या पूजाअर्चेची जबाबदारी आहे. पुर्वापार परंपरेनुसारच प्रत्येक एका कुटुंबाला एक वर्षे जोतिबाची पूजा करण्याचा मान मिळतो. ही कुटुंबे जोतिबाच्या पूजाअर्चेसह दरवर्षी नवरात्रोत्सव व चैत्रपौर्णिमेची यात्रा साजरी करतात. उत्सव काळात तर सर्व सातही कुटुंबे एकत्र येऊन जोतिबाची सेवा करत असतात.
जोतिबा मंदिराची स्थापना, जोतिबाची दैनंदिन पूजाअर्चा आणि पूजाअर्चा करणारी गुरव समाजातील कुटुंबे या सगळ्या मागे असलेल्या इतिहासालाही एक वलय प्राप्त झाले आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचा सरदार म्हणून जोतिबाकडे पाहिले जाते. जोतिबाचे मंदिर मात्र कोल्हापूरच्या उत्तर दिशेला 17 ते 18 किलो मीटर आंतरावरील वाडिरत्नागिरी येथे असल्याने इच्छा असूनही त्याकाळी कोल्हापूरकरांना दर्शनाला जाता येत नव्हते. शिवाय उत्तर दिशेच्या जंगल परिसरातून वाट काढत वाडिरत्नागिरीला जाणेही शक्य नसायचे. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजालगतच जोतिबाच्या मंदिराची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर 12 शतकात असावे असेही सांगितले जाते. मंदिरात काळ्या पाषणात जोतिबाची अडीच फुटी खडी मूर्ती व खालील बाजूस शिवलिंग आहे. त्यामुळे या मंदिराला जोतिर्लिंग मंदिर असे म्हणतात.
या मंदिरातील जोतिबाच्या पूजेचा मान बारा बुलतेदारांपैकी एक असलेल्या मंगळवार पेठ, गुरव गल्लीतील गुरव समाजाच्या 7 कुटुंबांना मिळाला आहे. दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा मान मिळाला असल्याचे पुजारी अभिमानाने सांगतात. मंदिरातील जमा-खर्चाचा हिशोब योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी सातही कुटुंबातील पुजाऱ्यांनी एकत्र येऊन 1954 साली श्री. फिरंगाई, महाकाली, एकविरा, त्र्युंबुलीदेवी आणि केदारलिंग देव एंडोमेन्ट या नावाने ट्रस्ट स्थापन केला. साधारणपणे याच काळात मंदिरातील जोतिबाच्या मूर्तीची झीज दिसून आली होती. आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करत वज्रलेपाचे आवरण देऊन मूर्तीला मजबूत केले. तेव्हापासून आजतागायत योग्यती खबरदारी घेत पूजाअर्चा केली जात आहे.
प्रत्येक रविवारी आणि खेट्यांमध्ये दर्शनाला होते गर्दी...
रविवार हा जोतिबाचा वार मानला होता. त्यामुळे जोतिर्लिंग मंदिरातील जोतिबासह शिवलिंग, यमाई, चोपडाई, कौलभैरवसह मंदिराबाहेरील नाईकबाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होते. बहुतांश भाविक श्रीफळ, दवना, गुलाल जोतिबाला अर्पण करत मनोकामना व्यक्त करतात. फेब्रुवारी महिना पालटला की वाडीरत्नागिरीवरील जोतिबाच्या खेट्यांना सुऊवात होते. खेट्यांसह चैत्रयात्रेला ज्यांना वाडिरत्नागिरीला जाता येत नाही ते जोतिबा रोडवरील जोतिबाचे दर्शन घेण्यात समाधान मानतात.
जोतिबाचा पालखी सोहळा अन् कट्यार-यमाईच्या विवाहाची परंपरा
प्रत्येक चैत्रयात्रेनिमित्त जोतिर्लिंग मंदिराच्या वतीने जोतिबाचा पालखी सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यात एक प्रापंचिक अधिष्ठान आहे. जोतिबाची सजवलेली पालखी आझाद चौकातील दत्तभिक्षालिंग मंदिरातील यमाईदेवीच्या भेटीला जाते. कोल्हापुरातील नवदुर्गांपैकी एक असलेल्या यमाईदेवीला एकविरादेवी म्हणूनही संबोधले जाते. या देवीच्या मंदिरात जोतिबाची कट्यार (कट्यारला ऋषी जमदग्नीचे प्रतिक मानले जाते.) व यमाईचा प्रतिकात्मक लग्न सोहळा सात कुटुंबातील पुजारीच साजरा करतात.
जोतिर्लिंगसह अन्य सात मंदिरांचाही मान...
जोतिबा रोडवरील जोतिर्लिंग मंदिरासह, फिरंगाई मंदिर, एकविरादेवी मंदिर, महाकालीदेवी मंदिर, टेंबलाई-मरगाईदेवी, रंकभैरव मंदिर व हुतात्मा पार्कातील सटवाई मंदिरांच्या पूजेचा मानही परंपरेनुसार सात कुटुंबाकडेच आहेत. शिवाय याही मंदिरातील देवदेवतांच्या पूजेचा मान प्रत्येक कुटुंबाला सहा वर्षानंतर एक वर्षासाठी मिळतो आहे. या मानाला आम्ही सातही कुटुंबे भाग्याचे प्रतिक मानतो.
पुजारी दीपक गुरव (जोतिर्लिंग मंदिर)