जोतिबा चैत्री यात्रेची इंग्लंडमध्ये नोंद
कोल्हापूर / सौरभ मुजुमदार :
भारतावर कित्येक वर्षे ब्रिटिश सत्तेचा अंमल होता. त्यांच्या कार्यपद्धतीमधील वैशिष्ट्यापूर्ण गोष्ट म्हणजे प्रत्येक घटनेची इत्यंभूत सविस्तर नोंद ठेवणे. अशा नोंदींवर अभ्यास करून इतिहासाची नवनवीन सुवर्णपाने आजही उलगडू शकतो. अशीच एक मौल्यवान गोष्ट म्हणजे इंग्लंडमधील एका इंग्रजी वृत्तपत्रात 8 जून 1868 रोजी म्हणजेच सुमारे 157 वर्षांपूर्वी ‘दख्खनचा राजा श्री जोतिबा देवांची चैत्र यात्रा’ आणि त्यावेळी घडलेल्या एका घटनेची माहिती प्रसिद्ध झाली होती. जी ‘तरुण भारत संवाद’ला इतिहास अभ्यासक यशोधन जोशी यांच्या संशोधनातून मिळाली.
तत्कालीन ब्रिटिश नोंदीमध्ये खरोखरच जोतिबा देवस्थानाविषयी सुंदर माहिती सापडते. ‘ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंट यांचा बंगला आहे. तेथून काही मैलांवर जोतिबाचा डोंगर आहे. ज्याची उंची सुमारे 1 हजार फुट आहे. हा संपूर्ण डोंगर दाट वनराईने वेढलेला आहे. या डोंगरावर सुमारे दोन हजार लोकवस्ती आहे. या वर्णनावरून डोंगर सभोवतालच्या दाट अशा जंगलाची तसेच देवांच्या पुजाऱ्यांची, तत्कालीन व्यवस्थेची आणि असणाऱ्या इतरही लोकसंख्येचीही माहिती मिळते. या डोंगरावर अनेक छोटी-मोठी मंदिरे असून मुख्य मंदिर शिवाचा अवतार असणाऱ्या जोतिबा देवाचे आहे. त्यावरूनच या डोंगराला जोतिबाचा डोंगर म्हणून ओळखले जाते,’ अशी नोंद आहे. भाविक प्रत्येक रविवारी, पौर्णिमेला देवाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी करतात, असे समजते. या नोंदीमध्ये आणखी माहिती अशी मिळते, की या देवस्थानचे जनमानसातील व भक्तांमधील महत्त्व हे अंबाबाई इतकेच आहे, म्हणजेच त्यावेळी अंबाबाई मंदिराप्रमाणेच जोतिबा डोंगरावर देखील तेवढीच गर्दी होत होती, असे दिसते.
- देवस्थानचे वार्षिक उत्पन्न होते 12 हजार
यातून जोतिबा देवांच्या सुमारे 157 वर्षांपूर्वीच्या प्रत्यक्ष चैत्र यात्रेची मौल्यवान माहिती मिळते. नुकत्याच झालेल्या देवाच्या वार्षिक चैत्र यात्रेच्या व्यवस्थापनासाठी ती सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले होते, असे समजते. तत्कालीन देवस्थानचे उत्पन्न सांगता येत नाही, परंतु 14 वर्षांपूर्वीच्या मेजर ग्रॅहमच्या कोल्हापूरच्या अहवालानुसार इसवी सन 1854 ला या देवस्थानचे वार्षिक उत्पन्न रुपये 12 हजार होते, हे समजते.
यात्रेदिवशी दिवसभर विविध पूजा पाठ सुरू असतात. देवस्थानचे हत्ती, घोडे हेही डोंगरावरच नेहमी ठाणबंद करून ठेवलेले असतात. जे चैत्रातील यात्रेवेळी मिरवणुकीसाठी वापरले जातात, यावरून असे समजते, की हत्ती आणि घोड्यांची संख्याही विपुल प्रमाणात असून ज्यावरून तत्कालीन वैभवाची व देवाच्या पालखी मिरवणुकीची भव्यता कशी असेल, याचीही कल्पना येते. आपल्याच एका अधिकाऱ्याने सुमारे 14 वर्षांपूर्वी लिहिलेल्या अहवालाचा मोठ्या खुबीने व विश्वासाने केलेला नोंदीचा वापर ही गोष्ट देखील येथे वैशिष्ट्यापूर्णच आहे.
दखल घेण्याजोगी घटना यात्रेदिवशी डोंगरावर घडलेली होती, ती अशी, काही शिपाई चिरीमिरी घेऊन भाविकांना दर्शनासाठी सोडत होते, ज्यावरून हवालदार व जमादाराचे जोरदार भांडण होते. जत्रेदिवशीच रात्री तो हवालदार जमादाराच्या तंबूत घुसून त्याच्यावर गोळी झाडतो, या घटनेवरून त्यावेळी देखील एवढी लाखोंची गर्दी व्यवस्थापनासाठी ब्रिटिश सरकारने विशेष नियोजन केलेले होते. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डोंगरावर राहण्यासाठी केलेले विशेष तंबू व इतर माहिती डोळ्यासमोर उभी राहते. जोतिबाच्या भोळ्या भाबड्या श्रद्धेपोटी व भक्तिपोटी येणाऱ्या लाखोंच्या गर्दीची तत्कालीन चैत्र यात्रेची माहिती अभ्यासकांसह अनेकांना मौल्यवानच ठरणार आहे.
- पायी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची नोंद
ग्रॅहमने त्यांच्या अहवालात हेही नोंदवले आहे, की जोतिबा देवाच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भक्तांसाठी रोज मोफत अन्नछत्र चालते. सुमारे 171 वर्षांपूर्वी देखील मोफत अन्नछत्र, तेही एवढ्या उंच डोंगरावर नियमितपणे चालवणे, हे देवाच्या निस्सीम भक्तीखेरीज कदापिही शक्य होणार नाही. ही मौल्यवान माहिती उजेडात येते.
- यात्रेवर नियंत्रणासाठी मंदिराभोवती शिपायांचे पथक
या संपूर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोतिबा मंदिरासभोवती शिपायांचे एक पथक तैनात केलेले होते. यात्रेदिवशी भाविकांचे लोंढेच्या लोंढे दर्शनासाठी मंदिराकडे येत होते, हे या नोंदीवरून असेही लक्षात येते, की कोणतीही प्रगत वाहतूक व्यवस्था, रस्ते, अथवा तत्सम सुखसोयी नसूनही लाडक्या दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो लोक डोंगरावर येत असावेत.