ऑस्ट्रेलिया टी-20 संघाच्या कर्णधारपदी जोश इंग्लिस
पाकविरुद्ध होणार मालिका, शेवटच्या वनडेचेही नेतृत्व जोश इंग्लिसकडे
वृत्तसंस्था/ कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया
यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस वनडे मालिकेच्या एका सामन्यात आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करणार आहे. पाकिस्तानविरुद्ध ही मालिका 14 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत ब्रिस्बेन, सिडनी, होबार्ट येथे खेळविली जाणार आहे.
फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लिसला अनुभवी ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टोईनिस यांच्याऐवजी नेतृत्व करण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पसंती दिली आहे. पाकिस्तानविरुद्ध तीन वनडे होणार आहेत. त्यातील दोन सामन्यात पॅट कमिन्स नेतृत्व करेल. भारताविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कसोटी स्टार्सना पाकविरुद्धच्या मालिकेत खेळविले जाणार नाही. इंग्लिसने भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केले होते. याशिवाय यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने निवृत्ती घेतल्याने इंग्लिस हा प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक असेल हे निश्चित आहे. इंग्लिसला कर्णधारपदी बढती मिळाल्याने कसोटी कर्णधार कमिन्स, स्टार्क, हॅझलवूड, लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या व शेवटच्या वनडेत संघाबाहेर राहतील. त्यांच्या जागी अन्य खेळाडूंना निवडण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. 8 रोजी अॅडलेडमध्ये दुसरा व 10 रोजी शेवटचा सामना पर्थमध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ : कमिन्स (पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार), जोश इंग्लिस (तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार), सीन अॅबॉट, झेव्हिय बार्टलेट, कूपर कोनोली, जेक फ्रेजर मॅकगर्क, आरोन हार्डी, हॅझलवूड (फक्त दुसरा सामना), स्पेन्सर जॉन्सन (तिसरा सामना), लाबुशेन, मॅक्सवेल, लान्स मॉरिस, जोश फिलिप (तिसरा सामना), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (पहिले दोन सामने), स्टार्क (दोन सामने), स्टोईनिस, अॅडम झाम्पा.
ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ : जोश इंग्लिस (कर्णधार), अॅबॉट, झेव्हियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नाथन एलिस, जेक फ्रेजर मॅकगर्क, आरोन हार्डी, स्पेन्सर जॉन्सन, मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टोईनिस, अॅडम झाम्पा.