कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जोर का धक्का धीरे से लगे !

06:22 AM Mar 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हा सामना सुरू होण्याअगोदर पुन्हा एकदा गजाभाऊंचा फोन आला. 19 नोव्हेंबर तारीख तो सुनी होगी? असं म्हणत माझ्या जखमेवर मीठ चोळत त्यांनी फोन ठेवला. 19 नोव्हेंबर 2023 हा दिवस माझ्या डोक्यातून किती प्रयत्न केले तरी जात नव्हता. आज तो दिवस खऱ्या अर्थाने इतिहासजमा झाला. डोक्यावरचं कित्येक मण ओझं उतरलं. काल रोहित शर्मा परत एकदा नाणेफेक हरला. मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकात हेडची डोकेदुखी संपणार होती. परंतु नशिबाची साथ, आणखी काय? म्हणत शमीने स्वत:चं सांत्वन केलं. सुऊवातीच्या काही षटकात काळोखात चाचपडल्याप्रमाणे फलंदाजी केल्यानंतर लगेच त्याने आपला गिअर बदलला. या अगोदरचे सर्व गोलंदाज हेडसाठी अपेक्षित प्रश्न संचातील प्रश्ना सारखे होते, जे तो आजपर्यंत पाठ करून जात होता. परंतु वऊण चक्रवर्ती हा हेडसाठी पाठ्यापुस्तकातील बाहेरच्या प्रश्नासारखा होता. खऱ्या अर्थाने तो इथे गंडला. जिथे दोन जीवनदान मिळाल्यानंतर हेडची डोकेदुखी वाढणार असे वाटत असतानाच भारताचं वऊण चक्रवर्ती नावाचं नवीन ट्रंप कार्ड कामी आलं. गुगली, लेगब्रेक ही या ट्रम्प कार्डची अपत्यं, ज्यानं कधी आयपीएल तर कधी ऑस्ट्रेलिया विऊद्ध भारतीय संघाला खुप मदत केली. प्रत्येक वेळी तुम्ही 5 गडी बाद करू शकत नाही. परंतु तुम्ही एखाद दुसरा गडी बाद केला जो चार ते पाच फलंदाजांच्या बरोबरीचा असला तर ते पाच गडी बाद करण्यासारखेच असतात.

Advertisement

त्यानंतर लाबुशेन आणि स्मिथने ज्या पद्धतीने नांगर टाकला तेव्हा पुन्हा एकदा भारतीय संघ अडचणीत येतो की काय असं वाटत असतानाच सर रवींद्र जडेजाने आपल्या भात्यातील नारायणास्त्रं, ब्रह्मास्त्रं बाहेर काढली. जॉस इंग्लिशला खऱ्या अर्थाने रवींद्र जडेजाने गुजराथी शिकवलं. स्टीव्ह स्मिथने आपल्याकडचा पूर्ण अनुभव पणास लावून संघाला तारलं. त्याला खऱ्या अर्थाने साथ दिली ती एलेक्स कॅरीने. आपल्याकडे दुसरीकडे या सामन्यात मोहम्मद शमीने ऐन मोक्याच्या क्षणी शमीच्या झाडावरची शस्त्रं उतरवली. अन्यथा, 280 धावा निश्चित बघायला मिळाल्या असत्या.

Advertisement

265 धावांचा पाठलाग करताना पहिले दोन रथी-महारथी तंबूत परतल्यानंतर आपली मधली फळी शहाणी होणार की नाही हा प्रश्न माझ्यासमोर पडला होता. परंतु खऱ्या अर्थाने अय्यर आणि कोहली यांनी धावांसाठी सामंजस्य करार केला, तोही अगदी दीर्घ कालावधीसाठी. माझ्या आयुष्यात मी बऱ्याच भारतीय खेळाडूंना धावांचा पाठलाग करताना बघितलंय. परंतु विराट कोहलीसारखा यासम हाच! गुऊवर्य रमाकांत आचरेकर सर नेहमीच म्हणायचे, तुम्ही जेवढं जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून रहाल तेवढ्या धावा अगदी सहज येतील. काल विराटच्या बॅटने तीच प्रचिती दाखवली. दिवार चित्रपटात शशी कपूर म्हणतो मेरे पास माँ है! त्याप्रमाणे आज भारतीय संघ सर्वांना ओरडून सांगत असेल हमारे पास चेजमास्टर विराट है! विराटसाठी कांगारूंनी बऱ्याच रंभा-उर्वशी नाचवल्या त्या मोहजालात विराट काही आला नाही, हे विशेष. एखाद्या फलंदाजाकडे किती संयम असावा हे काल विराट कोहलीने दाखवून दिलं.

दुबईची खेळपट्टी भारतीय संघासाठी नेहमीच नववधूच्या माहेरघरासारखी राहिली आहे. इथे यावं, आराम करावा आणि आरामात विजय मिळवावा! एक अपूर्ण काम अहमदाबादमध्ये राहिलं होतं ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. एक जखम काही दिवसांपूर्वी भरली होती. दुसरी जखम जी अश्वत्थामासारखी भळभळत होती, ती आज भरून तर निघालीच, सोबत सर्व काही हिशेब चुकते झाले. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन की ‘जोर का धक्का धीरे से लगे’!

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article