जो रुटचे शतक, इंग्लंड 7/302
झॅक क्रॉली, बेन फोक्सचेही संयमी योगदान : भारताच्या आकाशदीपचे पदार्पणातच तीन बळी
वृत्तसंस्था/ रांची
जो रुटचे नाबाद शतक (226 चेंडूत 106) व झॅक क्रॉली, बेन फोक्स व ओली रॉबिन्सन यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 7 बाद 302 धावापर्यंत मजल मारली. दिवसअखेरीस रुट 106 व रॉबिन्सन 31 धावांवर खेळत होते. दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. पण दिवसाचा शेवट रुटच्या शतकामुळे पाहुण्यांसाठी गोड झाला. भारतासाठी या सामन्यात पदार्पण करणाऱ्या आकाशदीपने तीन बळी घेण्याची किमया केली.
प्रारंभी, इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. पहिल्या सत्रातच साहेबांनी आपल्या पाच विकेट्स गमावल्या. 112 धावांवर त्यांनी पाच गडी गमावले होते. सलामीवीर झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी 47 धावांची सलामी दिली. आकाशचा हा पहिलाच सामना होता. यावेळी आकाशने पहिल्यांदा झॅक क्रॉलीला बाद केले होते. पण त्यावेळी नो बॉल असल्यामुळे त्याला बाद ठरवता आले नाही. पण त्यावेळी आकाशने हार मानली नाही. डावातील नवव्या षटकांत आकाशने बेन डकेटला 11 धावांवर बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर या षटकामध्येच आकाशने भारताला दुसरे यश मिळवून दिले आकाशने या षटकात ऑली पोपला पायचीत पकडले आणि एका षटकातच इंग्लंडला दुहेरी धक्के दिले. त्यानंतर झॅक क्रॉली हा खेळपट्टीवर पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यावेळी पुन्हा एकदा आकाश भारताच्या मदतीला धावून आला आणि झॅकला 42 धावांवर बाद केले. यानंतर आक्रमक खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोचा अडथळा अश्विनने दूर केला. अश्विनने त्याला पायचीत करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टोने 35 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले. यानंतर कर्णधार बेन स्टोक्सला जडेजाने बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. स्टोक्सने 3 धावा केल्या. यावेळी इंग्लंडची 5 बाद 112 अशी नाजूक स्थिती झाली होती.
दुसऱ्या सत्रात साहेबांचे जोरदार पुनरागमन
एकीकडे इंग्लंडचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत असताना रुटने मात्र शानदार खेळी साकारली. दुसऱ्या सत्रात रुट व बेन फोक्स यांनी 113 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे द्विशतक फलकावर लावले. रुटने फोक्सच्या साथीने यावेळी दुसरे सत्र एकही विकेट न गमावता खेळून काढले आणि भारताला चोख उत्तर दिले. तिसऱ्या सत्रात मात्र भारताला यश मिळाले. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या फोक्सला सिराजने बाद पेले. फोक्सने 126 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 47 धावा केल्या. यानंतर सिराजने टॉम हार्टलेलाही (13 धावा) बाद करत इंग्लंडला सहावा धक्का दिला.
रुटचे नाबाद शतक
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट संपूर्ण मालिकेत चमकला नव्हता. मात्र महत्वाच्या चौथ्या सामन्यात 31 वे कसोटी शतक ठोकत इंग्लंडला 250 धावांच्या पुढे नेले. कठीण परिस्थितीत रुटने संयमी खेळी साकाताना कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. त्याने 226 चेंडूचा सामना करताना 9 चौकारासह नाबाद 106 धावा केल्या. त्याला ओली रॉबिन्सनने 60 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह नाबाद 31 धावा करत चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 90 षटकांत 7 गडी गमावत 302 धावा केल्या होत्या. भारताकडून आकाशदीपने सर्वाधिक 3, मोहम्मद सिराजने 2 तर अश्विन व जडेजाने एकेक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव 90 षटकांत 7 बाद 302 (क्रॉली 42, जो रुट खेळत आहे 106, बेअरस्टो 38, बेन फोक्स 47, हार्टले 13, रॉबिन्सन खेळत आहे 31, आकाशदीप 3 तर सिराज 2 बळी).
शतकी खेळीसह रुटने केला अनोखा विक्रम
जो रुटने कसोटी कारकिर्दीतील आपले 31 वे शतक शुक्रवारी रांचीमध्ये साकारले. 219 चेंडूत त्याने हे शतक पूर्ण केले. जून 2023 नंतर रुटच्या बॅटमधून आलेले हे पहिले शतक आहे. दरम्यानच्या काळात त्याने दोन अर्धशतके केली. पण इतर सर्व वेळा तो स्वस्तात बाद झाला. या शतकी खेळीसह रुटने एक अनोखा विक्रम नोंदवला. रुट भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारा फलंदाज देखील ठरला. रांचीमध्ये खेळताना त्याने कारकिर्दीत भारताविरुद्ध 10 वे कसोटी शतक केले. याआधी स्टीव्ह स्मिथ आणि रुट यांनी प्रत्येकी 9-9 कसोटी शतके भारताविरुद्ध केली होती. पण शुक्रवारी रुट टीम इंडियाविरुद्ध 10 कसोटी शतके करणारा पहिला फलंदाज ठरला.
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारे फलंदाज
- जो रुट - 10 शतके (52 डाव)
- स्टीव्ह स्मिथ - 9 शतके (37 डाव)
- रिकी पाँटिंग - 8 शतके (51 डाव)
- विव्ह रिचर्ड्स - 8 शतके (41 डाव)
कसोटीत अश्विनचे ‘अनोखे शतक’
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने बेअरस्टोची विकेट घेत इतिहास रचला आहे. अश्विन हा इंग्लंडविरुद्ध 100 बळी घेणारा पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला करता आलेली नाही. याआधी अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 100 विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. त्याने कांगारुविरुद्ध आतापर्यंत झालेल्या कसोटीत 114 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, अश्विनने इंग्लंडविरुद्ध 100 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याच. याशिवाय फलंदाजीतही त्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 1085 धावाही केल्या आहेत. 100 कसोटी विकेट्स आणि फलंदाज म्हणून 1000 धावा इंग्लंडविरुद्ध करणारा अश्विन पहिलाच आशियाई क्रिकेटपटू देखील ठरला आहे.
पश्चिम बंगालच्या आकाशदीपचे कसोटी पदार्पण
चौथ्या कसोटीसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला व़िश्रांती देण्यात आली. यानंतर प्लेईंग 11 मध्ये कर्णधार रोहितने बंगालचा युवा गोलंदाज आकाशदीपवर विश्वास टाकत त्याला कसोटी पदार्पणाची संधी दिली. या संधीचे सोने करताना पदार्पणातील पहिल्याच कसोटीत भन्नाट स्पेल टाकत आकाशदीपने तीन विकेट घेतल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकाशदीपने कठीण परिस्थितीत हा टप्पा गाठला आहे. मागील दोन वर्षात त्याने रणजी करंडकात शानदार कामगिरी साकारली आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध रांची कसोटीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कॅप देऊन त्याचे टीम इंडियात स्वागत केले.