निर्जन बेटावर नोकरीची संधी
गोंगाटयुक्त समाजापासून दूर राहत नोकरी करत पैसा कमाविण्याची संधी अनेकांना हवी असते. आता अशाच एका नोकरीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. ब्रिटनच्या एका निर्जन बेटावर जात काम करण्याची संधी उपलब्ध आहे. या बेटावर केवळ दोन लोक राहतात, हे बेट स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले आइल ऑफ रोना आहे. या बेटावर एक स्टेट वर्कर म्हणून काम करावे लागणार आहे. या बेटावर दोन अशा मालमत्ता आहेत, ज्या खासकरून सुटी व्यतित करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आल्या आहेत. या नोकरीकरता ऑनलाइन जाहिरात प्रकाशित झाली असून यात पात्रतेचा उल्लेख आहे.
हे बेट एक पूर्णवेळ इस्टेट वर्करसाठी असून त्याला अनेक जबाबदाऱ्यांसह खास प्रकल्पाच्या कामावर लक्ष द्यावे लागणार आहे. यशस्वी उमेदवार अनेक कामे आणि भूमिका बजावेल, ज्यात इस्टेट आणि संपत्तीची देखरेख-व्यवस्थापन, हाउस कीपिंग, लॉजिस्टिकसह हरणांचा सांभाळ, त्यांची देखभाल, त्यांचे मांस शिजविण्याची प्रक्रिया सामील आहे.
या बेटावर विजेचे ग्रिड नाही तेथे सौर पॅनेल, जनरेटर आणि इनव्हर्टर आहे. याचबरोबर नौका, खोदकाम करण्याची अवजारे, मशीन्स आणि अनेक प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत, ज्यांची देखभाल करावी लागेल. या पदासाठी काही वैयक्तिक गुणांचा उल्लेख करण्यात आला असून यात विश्वसनीयता, सक्षमता, मजबुती, उत्साह, दुर्गम भागांमध्ये दीर्घकाळ आनंदी राहणे, सेन्स ऑफ ह्यूमर तसेच पाहुण्यांसोबत मिळून-मिसळून राहण्याचा गुण असावा लागेल.