रोजगार मेळाव्यात 447 उमेदवारांना नोकरीची संधी
महिला महाविद्यालयाच्यावतीने आयोजन ; विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग
बेळगाव : जिल्हा रोजगार विनिमय केंद्राच्या साहाय्याने बेळगाव येथील शासकीय प्रथम श्रेणी महिला महाविद्यालयातर्फे सरदार हायस्कूल कॅम्पस येथे 28 नोव्हेंबर रोजी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. उपस्थित मान्यवरांनी रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी बेंगळूर, बेळगाव, गोवा येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्स, फॉक्सकॉन, अॅडेक्को, एकस, आयसीआयसीआय बँक, मुथूट फायनान्स, क्वेस आणि इतर नामांकित कंपन्यांनी भाग घेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या.
मुलाखतीनंतर 447 उमेदवारांना जागेवरच ऑफर लेटर
प्रारंभी प्लेसमेंट समन्वयक डॉ. शमशुद्दीन एम. नदाफ यांनी सहभागी कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांचा परिचय करून दिला. मेळाव्यात 879 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 735 उमेदवार प्रत्यक्ष मेळाव्यासाठी उपस्थित होते. अनेक फेऱ्यांच्या छाननी व मुलाखतीनंतर, 447 उमेदवारांची निवड केली आणि त्यांना जागेवरच ऑफर लेटर दिले. जिल्हा रोजगार विनिमय केंद्राचे समन्वयक संतोष एन. यांनी कॉर्पोरेट जगातील संधी या विषयावर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश मांगलेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी तरुण महिलांसाठी अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी निर्माण केल्याबद्दल प्राध्यापक, जिल्हा रोजगार विनिमय पेंद्र आणि सहभागी कंपन्यांच्या सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली. यावेळी जी. एस. केरसगाव, डॉ. ज्योती यमकनमर्डी, डॉ. जयशिला, डॉ. एस. बी. गंगानल्ली, डॉ. एल. पी. बोडनवर, सविता चौगुले व इतर प्राध्यापक सदस्य उपस्थित होते.