For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

05:55 PM Mar 22, 2025 IST | Radhika Patil
नोकरीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक
Advertisement

कराड :

Advertisement

नोकरी लावण्याच्या आमिषाने आठ ते दहा युवक-युवतींची सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास राजाराम थोरात (रा. सवादे, ता. कराड) व सुधीर सूर्यकांत वचकल (रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुमित पोपट जाधव (वय २५, रा. घोगाव, ता. कराड) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संशयितांनी पैसे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवादे येथील विकास थोरात व पुरंदर जिल्ह्यातील वीर येथील सुधीर वचकल हे दोघेजण कराड तालुक्यातील विंग येथे ज्ञानवर्धिनी क्लासेस चालवितात. ते दोघेजण बेरोजगार युवक-युवतींना नोकरी मिळवून देतात, अशी माहिती सुमित जाधव याला मिळाली होती. त्यानुसार त्याने मार्च २०२२ मध्ये विंग येथे जाऊन विकास थोरात व सुधीर वचकल या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी सुमितला जलसंपदा खात्यात नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी एक लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. सुमितचा टाळगाव येथील मित्र अभिजीत महादेव चिंचुलकर यानेही नोकरीसंदर्भात तेथे चौकशी केली.

Advertisement

दरम्यान, नोकरी लावण्यासाठी सुमित जाधव याने २७ एप्रिल २०२२ रोजी एक लाख रुपये संशयितांना दिले. तसेच अभिजीत चिंचुलकर यानेही एक लाख रुपये दिले. काही दिवसानंतर पुन्हा सुमित याने आणखी २५ हजार रुपये दिले. मात्र तरीही संशयितांकडून नोकरी लावण्यात वारंवार टाळाटाळ केली जात होती. तसेच पैसेही परत दिले जात नव्हते. सुमित जाधव व अभिजीत चिंचुलकर यांनी वारंवार विचारणा करूनही संशयितांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. अखेर आपल्यासह इतर युवक-युवतींची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुमित जाधव याने याबाबत कराड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.

घोगाव येथील सुमित जाधव याच्याकडून एक लाख २५ हजार, टाळगाव येथील अभिजीत चिंचुलकर याच्याकडून एक लाख, साकुर्डी येथील अक्षय विश्वनाथ ढगाले याच्याकडून एक लाख, बहुले येथील प्रणित चंद्रकांत जाधव याच्याकडून ५० हजार, नावडी येथील किरण भानुदास कदम याच्याकडून एक लाख, ओंड येथील विवेक आनंदा थोरात याच्याकडून ५५ हजार तसेच अकाईचीवाडी येथील सारिका अशोक कदम हिच्याकडून ५० हजार रुपये घेऊन संशयितांनी त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.