रोजगार मेळाव्यातून मिळाली 3 वर्षात 6800 जणांना नोकरी
कोल्हापूर / विनोद सावंत :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने नामवंत कंपनीच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेतले जात आहेत. या मेळाव्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन वर्षात या मेळाव्यातून तब्बल 6 हजार 882 युवकांची प्राथमिक निवड झाली असून यामधील बहुतांशी जणांना नामवंत कंपनीमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे.
बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी शासकीय पातळीवर वेगवेगळे उपक्रम, योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र महत्वाची भूमिका बजावत आहे. या केंद्राच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेतले जातात. नामवंत कंपनीना कुशल मनुष्यबळाची गरज असते. त्यांच्या कंपनीत अनेक जागा रिक्त असतात. तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक युवक नोकरीच्या शोधात असतात. दोन्ही घटकांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यातून होत आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने रोजगार मेळाव्यासाठी महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि असोसिएशन, पॉलिटेक्निक कॉलेज यांची मौलाची मदत होते. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचाही यामध्ये समावेश आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व इतर महामंडळे स्वयंरोजगार बाबत माहिती देण्यासाठी मेळाव्यामध्ये उपस्थित असतात. महिलांसाठीही स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन केले जाते. गेल्या तीन वर्षापासून अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यातून 6 हजार 882 बेरोजगारांची प्राथमिक निवड झाली आहे. यामुळे रोजगार मेळाव्याचा उद्देशही सफल होत आहे.
- 100 दिवसाच्या कार्यक्रमात 670 जणांना नोकरी
राज्यशासनाने शासकीय पातळीवर 100 दिवसाचा कार्यक्रम आखून दिला आहे. यामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे हाही आहे. या 100 दिवसाच्या कार्यक्रामांतर्गत झालेल्या मेळाव्यात 670 युवकांना नोकरीची संधी मिळाली आहे.
- मेळाव्यातून यांनी मिळते नोकरीची संधी
किमान 10 वी, 12 वी, हॉटेल व्यवस्थापन व तत्सम कोर्स, शेफ, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय.
- रोजगार मेळावे 2023-24
उद्दिष्टे -16 मेळावे
वर्षभरात झालेले मेळावे-15
एकूण रिक्तपदे -8015
मेळाव्यास उपस्थित कंपनी -133
एकूण उपस्थित उमेदवार-2058
प्राथमिक निवड-1582
- रोजगार मेळावे 2022-23
एकूण रोजगार मेळावे-16
मेळाव्यास उपस्थित कंपनी-256
एकूण रिक्तपदे -15794
मेळाव्यास उपस्थित उमेदवार-6424
प्राथमिक निवड-4165
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने रोजगार मेळावे घेतले जातात. नामवंत कंपनीमध्ये युवकांना रोजगार उपलब्ध होत आहेत. तीन वर्षात सुमारे 6 हजार 800 युवकांची प्राथमिक निवड झाली आहे. सध्या रोजगारांच्या भरपूर संधी असून जास्तीत जास्त युवकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
जमीर करीम, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर