जीवन-विजय दुहेरीत विजेते
युकी-ओलीव्हेटी चेंगडू स्पर्धेत दुहेरीत उपविजेते
वृत्तसंस्था / हांगझोयु, चेंगडू
चीनमधील हांगझोयु एटीपी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या एन. जीवन आणि त्याचा साथीदार विजय सुंदर प्रशांत यांनी पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले तर एटीपी टूरवरील झालेल्या चेंगडू खुल्या टेनिस स्पर्धेत युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार अल्बेनो ओलीव्हेटी यांनी पुरूष दुहेरीत उपविजेते पटकाविले.
हांगझोयु आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बिगर मानांकित भारतीय जोडी जीवन आणि विजय यांनी जर्मनीच्या बिगर मानांकित फ्रेंटझेन आणि जेबेन्स यांचा 4-6, 7-6(7-5), 10-7 अशा सेटस्मध्ये पराभव केला. एटीपी टूरवरील विजयचे हे पहिले विजेतेपद आहे. हा अंतिम सामना 110 मिनिटे चालला होता. 35 वर्षीय जीवनचे एटीपी टूरवरील हे दुसरे जेतेपद आहे. 2017 साली जीवनने रोहन बोपन्नासमवेत चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले होते. या अंतिम लढतीत जीवन आणि विजय यांना पहिला सेट गमवावा लागला त्यानतंर दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला आणि तो जीवन आणि विजय यांनी जिंकून बरोबरी साधली. तिसरा आणि निर्णायक सेट जीवन आणि विजय यांनी आपल्या अचूक आणि वेगवान सर्व्हिसच्या जोरावर जिंकला.
चेंगडू खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार ओलीव्हेटी यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या डोंबिया आणि रिबॉल यांनी युकी आणि ओलीव्हेटी यांचा 6-4, 4-6, 10-4 असा पराभव केला. 2024 च्या टेनिस हंगामात युकी आणि ओलीव्हेटी यांचे एटीपीटूरवरील तिसरे जेतेपद थोडक्यात हुकले. या स्पर्धेत आणि ओलीव्हेटी यांनी उपांत्यफेरीत डोडीग आणि मॅटो यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. गेल्या जुलैमध्ये युकी आणि ओलीव्हेटी यांनी स्वीस खुल्या तर एप्रिल महिन्यात या जोडीने बीएमडब्ल्यु खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले होते.