जिओ-एअरटेलचा रिचार्ज महागला
जिओचा 239 चा प्लॅन आता 299 रुपयांना : एअरटेलच्या किंमती वाढल्या
नवी दिल्ली :
बुधवारपासून म्हणजेच 3 जुलै 2024 पासून जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज 25 टक्क्यांनी महाग झाले आहेत. दोन्ही कंपन्यांनी 27 आणि 28 जून रोजी टॅरिफ दरात वाढ करण्याची घोषणा केली होती, जी लागू करण्यात आली आहे.
जुनच्या सुरुवातीला दूरसंचार कंपन्या आपल्या कॉलदरात वाढ करणार असल्याच्या शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्या होत्या. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ यांनी सर्वप्रथम कॉलदरात वाढ केली आणि मग पाठोपाठ भारती एअरटेलनेही रिचार्ज दरात वाढीची घोषणा केली. जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 299 रुपये झाली आहे.
यात अमर्यादित कॉलिंगसह 1.5 जीबी डेटा आणि 300एसएमएस प्रतिदिन दिला जातो. त्याच वेळी, एअरटेलचा 179 रुपयांचा सर्वात परवडणारा रिचार्ज प्लॅन आता 199 रुपयांचा झाला आहे. यात 28 दिवसांपर्यंत अमर्यादित कॉलिंग, 2जीबी डेटा आणि 100 एसएमएस प्रतिदिन मिळतात.
व्होडाफोन-आयडियाचे रिचार्ज आणखी महागणार
दरम्यान व्होडाफोन-आयडिया (व्हीआय)ने देखील सुमारे 20 टक्के दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. व्हीआयचे नवीन रिचार्ज दर आजपासून म्हणजेच 4 जुलैपासून लागू होणार आहेत.
डिसेंबर 2021 मध्ये 20 टक्के वाढ
यापूर्वी, सर्व दूरसंचार कंपन्यांनी डिसेंबर 2021 मध्ये त्यांच्या दरांमध्ये 20 टक्केपेक्षा जास्त वाढ केली होती.