झारखंड, राजस्थान विजयी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या ड गटातील सामन्यात यष्टीरक्षक आणि फलंदाज ईशान किशनच्या शानदार शतकाच्या जोरावर झारखंडने त्रिपुराचा 8 गड्यांनी पराभव केला. तर या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात राजस्थानने कर्नाटकावर केवळ एका धावेने थरारक विजय मिळविला.
त्रिपुराने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 182 धावा जमविल्या. त्यानंतर झारखंडने 17.3 षटकात 2 बाद 185 धावा जमवित विजय नोंदविला. झारखंडला या विजयाबरोबरच 4 गुण मिळाले. या स्पर्धेत झारखंडचे आता 12 गुण झाले आहेत. त्रिपुराच्या डावात विजय शंकरने 59 तर विक्रम कुमारदासने 42 आणि मुरासिंगने 42 धावा केल्या. झारखंडच्या रॉयने 2 गडी बाद केले. त्यानंतर झारखंडच्या डावात ईशान किशनने 50 चेंडूत 8 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 113 तर विराट सिंगने नाबाद 53 धावा झळकाविल्या.
राजस्थान विजयी
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात राजस्थानने कर्नाटकाचा केवळ एका धावेने पराभव करत 4 गुण वसूल केले. या स्पर्धेत राजस्थानचे आता 12 गुण झाले आहेत. राजस्थानने 20 षटकात 5 बाद 201 धावा जमविल्या. त्यानंतर कर्नाटकाने 20 षटकात 8 बाद 200 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानच्या डावात लोमरोरने नाबाद 48, कार्तिक शर्माने 46, दीपक हुडाने 43 धावा केल्या. त्यानंतर कर्नाटकाच्या डावात करुण नायरने 51 तर स्मरणने नाबाद 48, देवदत्त पडीकलने 32 धावा जमविल्या.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात तामिळनाडूने उत्तराखंडचा 5 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात उत्तराखंडने 20 षटकात 6 बाद 164 धावा जमविल्यानंतर तामिळनाडूने 17.1 षटकात 5 बाद 168 धावा जमवित विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक-राजस्थान 20 षटकात 5 बाद 201, कर्नाटक 20 षटकात 8 बाद 200, त्रिपुरा 20 षटकात 7 बाद 182, झारखंड 17.3 षटकात 2 बाद 185 (ईशान किशन नाबाद 113). उत्तराखंड 20 षटकात 6 बाद 164, तामिळनाडू 17.1 षटकात 5 बाद 168.