झारखंड, ओडिशा उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ जालंधर
हॉकी इंडियाच्या येथे सुरु असलेल्या 14 व्या कनिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत झारखंड आणि ओडीशा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
रविवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात झारखंडने गुजरातचा 27 गोलांनी दणदणीत पराभव केला. झारखंडतर्फे अॅडिसन मिंझने 6 गोल नोंदविले. गुरन लोहराने 5 गोल केले. रोषन एक्काने 4 तसेच दीपक सोरेंगने 4 गोल नोंदविले. बरेक कमल चिकने 3 गोल केले. या सामन्यात शेवटपर्यंत गुजरातला आपले खाते उघडता आले नाही.
दुसऱ्या एका सामन्यात ओडीशाने दादरा नगर हवेली व दमन दीव संघाचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. रविवारी झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जम्मू काश्मिरने राजस्थानचा 6-2 असा पराभव केला. आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. तामिळनाडूने बंगालचा 6-0 असा एकतर्फी फडशा पाडला.