झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना अटक
ईडीकडून कारवाई : साहाय्यकाच्या घरात मिळाले 37 कोटी रुपये
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ईडीने प्रदीर्घ चौकशीनंतर बुधवारी अटक केली आहे. आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरातून 37 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी आलम यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. आलमगीर यांच्यावर कारवाई झाल्याने राज्यातील झामुमो-काँग्रेस सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच झामुमोचे प्रमुख हेमंत सोरेनदेखील सध्या तुरुंगात आहेत.
झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांच्या अटकेची पुष्टी ईडीने दिली आहे. ईडीने रविवारी आलमगीर यांना समन्स बजावला होता. 14 मे रोजी रांची येथील विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले होते. मंगळवारी ईडीने त्यांची तब्बल 10 तासांपर्यंत चौकशी केली होती. यानंतर त्यांना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.
6 मे रोजी ईडीने आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचे घरगुती कामगार जहांगीर आलम यांच्या अपार्टमेंटवर छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान 37 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. याचबरोबर जहांगीरच्या फ्लॅटमधून काही दागिनेही हस्तगत करण्यात आले होते. छाप्याच्या कारवाईनंतर जहांगीर आलम आणि संजीव लाल या दोघांना अटक करण्यात आली.
कोण आहेत आलमगीर आलम?
काँग्रेस नेते आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा आमदार राहिले आहेत. सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कामकाज आणि ग्रामविकास मंत्री आहेत. यापूर्वी 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 पर्यंत ते झारखंड विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते.