For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्तांना हटवले

06:27 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्तांना हटवले
Advertisement

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर अजयकुमार सिंह यांची नियुक्ती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय निवडणूक आयोगाने प्रभारी पोलीस महासंचालक (डीजीपी) अनुराग गुप्ता यांना तत्काळ प्रभावाने हटवण्याचे निर्देश दिल्यानंतर झारखंड सरकारने त्यांना पदमुक्त केले. आता अजयकुमार सिंह यांची महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी झारखंड सरकारला यासंबंधी निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात त्यांना डीजीपी पदावरून तत्काळ हटवण्यात यावे आणि पॅडरमध्ये उपलब्ध असलेल्या डीजीपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपवण्यात यावा, असे म्हटले होते. गेल्या निवडणुकीत डीजीपी अनुराग गुप्ता यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement

झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचदरम्यान, निवडणूक आयोगाने कार्यकारी डीजीपी यांना तत्काळ पदावरून हटवण्याचे निर्देश दिले.

अनुराग गुप्ता यांच्यावर मागील निवडणुकांदरम्यान आलेल्या तक्रारी आणि निवडणूक आयोगाने केलेली कारवाई याच्या आधारे त्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने संभाव्य डीजीपी अधिकाऱ्यांची यादी मागवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार डीजीपी पदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने झारखंड सरकारला सूचनांचे पालन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाने अनुराग गुप्ता यांच्यावर पक्षपाती वर्तनाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना झारखंडच्या एडीजी (विशेष शाखा) पदावरून मुक्त करून दिल्लीतील निवासी आयुक्त कार्यालयात नियुक्त करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झारखंडमध्ये परतण्यास बंदी होती. यासोबतच 2016 मध्ये झारखंडमधून राज्यसभा निवडणुकीदरम्यान सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशीही केली जात आहे.

Advertisement
Tags :

.