माजी सरपंचाच्या घरातील चोरीचे १२ तोळ्याचे दागिने कोडोली पोलीसांकडून सपूर्द
वारणानगर / प्रतिनिधी
शहापूर ता.पन्हाळा येथील माजी सरपंच डॉ.कृष्णात पाटील यांच्या घरी दि. १८ नोव्हेंबर रोजी भरदिवसा झालेल्या चोरीतील सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने आज गुरुवार दि. ११ रोजी पाटील दाम्पत्यांना कोडोली पोलीसांनी परत सपूर्द केले. माजी सरपंच डॉ. पाटील यांचे दुपारी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे सव्वासहा लाखांचा माल चोरला होता.कोडोली पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर विभागाने यामध्ये शिताफीने घरफोड्या करणाऱ्या कराड येथील इब्राहीम शेख याला मुद्देमालासह अटक केली होती.
कोडोली पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांनी सी.सी.टी.व्ही., दुचाकी नंबर, ठसे तज्ञ आणि श्वानपथकाची मदत घेत तत्परतेने तपास करत अट्टल चोरट्यास पकडले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवार दि. ११ रोजी कोडोली पोलिसांनी तो चोरीतील मुद्देमाल डॉ. दाम्पत्यांच्या ताब्यात दिले. यामध्ये ३१ ग्रम, २५ ग्रम, ५ ग्रमची तीन मंगळसूत्रे, १० ग्रमचे टोप्स, ५ ग्रमची अंगठी, २० ग्रमची मोहनमाळ, १५ ग्रमचा नेकलेस असा सुमारे १२ तोळे जिन्नस मुद्देमाल समावेश आहे. पहिल्या दिवशी ४ तोळे, दुसऱ्या दिवशी पुरवणी जबाबात ८ तोळ्यांची नोंद झाली होती.
डॉ. कृष्णात पाटील व त्यांच्या पत्नी डॉ. सविता पाटील यांच्याकडे सापडलेला चोरीतील मुद्देमाल सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, उपनिरीक्षक नामदेव दांडगे, सुनिल पाटील, रुपाली खाडे, हवालदार दत्तात्रय हारुगडे यांनी सुपूर्द केला. यावेळी शहापूरचे उपसरपंच राहुल पाटील,अनिल मोरे, सागर कडवेकर, अमर पाटील, सतीश पाटील आदींची उपस्थिती होती.