बसस्थानकावर दागिने चोरणाऱ्या टोळीला अटक
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा उठवत महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने, तसेच बॅगमधील सोन्याचे दागिने पळविणाऱ्या तीन सराईत चोरट्या महिलांना मंगळवारी मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 72 हजार ऊपये किमतीचे 143 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अनिता नितीन चौगुले (वय 40), सिंपल एकांत लोंढे (वय 35), निशा शंकर लोंढे (वय 25, तिघे रा. बसवनगर, गँगवाडी बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानकावर सातत्याने प्रवासी महिलांच्या गळ्यातील, तसेच पर्समधील सोन्याचे दागिने पळवण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवासी महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 मार्च रोजी कांचन विश्वनाथ गौडर (रा. गोकुळ रोड, हुबळी) यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकार्याने तपास करून वरील तीन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पाच प्रकरणांची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.