अंजनेयनगरात वृद्धेच्या गळ्यातील तीन लाखांचे दागिने खेचले
मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांचे कृत्य
बेळगाव : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील 3 लाखांचे दागिने पळविले आहेत.पाच दिवसांपूर्वी अंजनेयनगर परिसरात ही घटना घडली असून सोमवारी माळमारुती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.बुधवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.अंजनेयनगर येथील पुष्पा चिदानंद क्षीरसागर (वय 65) या केएमएफजवळील गणेश मंदिरात देवदर्शन घेऊन चालत घरी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून त्यांच्यासमोरून आलेल्या दोघा भामट्यांनी हे कृत्य केले आहे.
यासंबंधी सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पाठीमागे बसलेल्या भामट्याने पुष्पा यांच्या गळ्यातील 30 ग्रॅमचे मंगळसूत्र व 30 ग्रॅमचा मोतीहार असे 60 ग्रॅमचे दागिने पळविले आहेत.केएमएफपासून जवळच असलेल्या एका शाळेजवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर धक्का बसलेल्या वृद्धेने मदतीसाठी आरडाओरड केली. लोक जमा होण्याआधीच भामट्यांनी सुसाट वेगाने तेथून पलायन केले. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शहर व उपनगरात चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ वाहने चोरी व चेनस्नॅचिंगही सुरू झाले आहेत.