मिरज तालुक्यातील त्रिकुटाकडून 40 लाखांचे दागिने जप्त
दरोडा, वाटमारी, चोरीप्रकरणी आंतरराज्य गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या : अथणी, कागवाड, ऐगळी पोलिसांची कारवाई
बेळगाव : आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील तिघा जणांना अटक करून 40 लाख रुपये किमतीचे 522 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अथणी, कागवाड, ऐगळी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली. अटक करण्यात आलेले तिघेजण मिरज तालुक्यातील असून या त्रिकुटाने अथणी, कागवाड, ऐगळी व घटप्रभा पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 10 हून अधिक गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. एक दरोडा, एक वाटमारी व आठ घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
रमेश नबीब भोसले (वय 20), कुरशन उर्फ किशन गुरुपाद उर्फ जाधव-भोसले (वय 20, दोघेही रा. अरग, ता. मिरज), शंकर उर्फ युवराज काशिनाथ उर्फ लिंगम भोसले (वय 23, रा. शिंदेवाडी, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 40 लाख रुपये किमतीचे 522 ग्रॅम सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रृती एन. एस., अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसरगी, अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळुर, ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक कुमार हडकर, कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक राकेश बगली, अथणीचे पोलीस उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, एम. बी. बिरादार, ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक सी. बी. सागनूर आदींचा समावेश असलेले एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
पोलिसांचे कौतुक
या पथकातील पुरुषोत्तम नाईक, महांतेश पाटील, अण्णासाब इरकर, सुरेश नंदीवाले, बिरप्पा व्यापारी, धर्मेंद्र शानवाड, जमीर पटेगार, जमीर डांगे, महांतेश खोत, संजूकुमार सनगोंड, श्रीधर बांगी, रमेश हादीमनी, हसन करोशी, अमीरखान मैगूर व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कण्णवर, आदींनी मिरज तालुक्यातील त्रिकुटाच्या मुसक्या आवळून चोरी प्रकरणातील सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस पथकातील अधिकारी व पोलिसांचे कौतुक केले आहे.