प्रवासी महिलेचे दागिने चोरणारा चोरटा गजाआड! विक्रीसाठी फिरत असताना संशयित जाळ्यात
महिला कोथरुड पुण्याची : शुक्रवारी पेठनाक्यावरुन चोरले होते दागिने
इस्लामपूर प्रतिनिधी
पेठनाका येथील हॉटेल न्यू मणिकंडन समोरुन बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या विजय यंकाप्पा कुचिवाले (रा.माकडवाले गल्ली, कापूसखेड रोड, इस्लामपूर)या आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडे चार लाख रुपये किंमतीचे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी कौशल्याने तपास करुन अवघ्या दोन दिवसात या चोरीचा छडा लावला.
कोथरुड पुणे येथील गायत्री बळवंत सासवे (24) व त्यांचे पती पुणे ते बेंगलोर असा खासगी बसने प्रवास करीत होते. शुक्रवारी रात्री 10 वाजता ही बस पेठनाका येथील हॉटेल न्यू मणिकंडन येथे नाष्टा व जेवणासाठी थांबली. दरम्यान, गायत्री सासवे या पर्स सोबत घेवून त्यांच्या पतीसह उतरुन हॉटेलमध्ये गेल्या. बाहेर पडल्यानंतर त्यांनी पर्स उघडून पाहिली असता, दागिण्याची पेटी पर्समध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यांनी शोध घेवून इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत व शशिकांत शिंदे यांना गोपनिय बातमीदारामार्फत एक संशयित सोन्याचे दागिने विक्री करण्याचे उद्देशाने ग्राहक शोधत फिरत असल्याची माहिती मिळाली. हवालदार संदीप गुरव, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत शिंदे, सतिश खोत, अमोल सावंत, विशाल पांगे, दिपक घस्ते, कॅप्टनसाहेब गुंडवाडे, विजय पाटणकर, विवेक साळुंखे यांनी कापूसखेड रोड येथे सापळा लावून कुचीवाले यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळून आले. या दागिण्याबाबत चौकशी केली असता, त्याने दोन दिवसापूर्वी मणिकंडन हॉटेल समोरुन ट्रॅव्हल्स मधून गर्दीचा फायदा घेत दागिने चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र, सव्वा लाखांचे दीड तोळे वजणाची सोन्याची चैन, साडे चार वजनाची सोन्याची अंगठी, साडे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, छुबे जोड हस्तगत पेली आहेत. अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. कुचिवाले याला अटक केली असून अधिक तपास हवलदार गुरव करीत आहेत.