‘अॅटलस’मध्ये जेनिफर लोपेझ
एआयच्या जगतावर आधारित चित्रपट
जेनिफर लोपेझ ही हॉलिवूडची प्रसिद्ध कलाकार आहे. 1993 मध्ये पदार्पण करणाऱ्या जेनिफरने तीन दशकांच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेनिफरने आतापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, परंतु ती पहिल्यांदाच सायन्स फिक्शन चित्रपटात स्वत:च्या अभिनयाची जादू दाखविणार आहे.
जेनिफर आगामी चित्रपट ‘अॅटलस’मध्ये अॅक्शन करताना दिसून येईल. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ब्युटी क्वीन पहिल्यांदाच एखाद्या साई-फाय चित्रपटात काम करत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जेनिफरची भूमिका पाहण्याजोगी आहे.
अॅटलस चित्रपटात जेनिफर ही अॅटलस शेफर्डची भूमिका साकारत आहे. अॅटलस एक कुशाग्र डाटा अॅनालिस्ट असून तिला आर्टिफिशियल इंटेलिजेन्सबद्दल चीड आहे. ती स्वत:च्या पूर्ण जीवनात हार्लन नावाच्या एआयचा शोध घेत असत. हार्लनला पकडण्यासाठी अॅटलस एका मोहिमेवर जात असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
अॅटलसची ही मोहीम रोबोटशिवाय अपूर्ण आहे, याचमुळे स्मिथ नावाच्या रोबोटसोबत मिळून हार्लनला पकडण्यासाठी ती स्वत:ला झोकून देते. यादरम्यान तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेनिफरने अॅटलसची भूमिका साकारत अॅक्शनद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ब्रॅड पेटन दिग्दर्शित अॅटलस चित्रपटात जेनिफरसोबत सिमू लियू, स्टर्लिंग के. ब्राउन, ग्रेगरी जेम्स कोहन, अब्राहम पॉपुला, लाना पॅरिला आणि मार्क स्ट्राँग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. बॅडने दिग्दर्शनासोबत चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. तर चित्रपटाची कहाणी लियो सरदारियन आणि एरोन अली कोलाइट यांनी मिळून लिहिली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.