महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जयसूर्याची जादुई फिरकी, न्यूझीलंडचा 88 धावांत खुर्दा

06:58 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसरी कसोटी : प्रभात जयसूर्याचे 42 धावांत 6 बळी :  अद्याप 315 धावांनी पिछाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था/ गॅले, श्रीलंका

Advertisement

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या (6 बळी) व निशान पेरिस (3 बळी) यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाने शरणागती पत्करली. न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 88 धावांत गारद झाला. यानंतर 514 धावांची आघाडी घेत लंकन संघाने इतिहास रचला. फॉलोऑननंतर खेळताना किवीज संघाची खराब स्थिती झाली असून तिसऱ्या दिवसअखेरीस 5 बाद 199 धावा केल्या आहेत. दिवसअखेरीस टॉम ब्लंडेल 47 व ग्लेन फिलिप्स 32 धावांवर खेळत होते. किवीज संघ अद्याप 315 धावांनी पिछाडीवर असून डावाने पराभव टाळण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

प्रारंभी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 163.4 षटकांत 5 बाद 602 धावा करुन पहिला डाव घोषित केला होता. ज्यामध्ये कामिंदू मेंडिस (नाबाद 186), दिनेश चंडिमल (116) आणि कुशल मेंडिस (नाबाद 106) यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. याशिवाय, अँजेलो मॅथ्यूजने 88 आणि दिमुथ करुणारत्नेने 46 धावा केल्या. कर्णधार धनंजय डी सिल्वाने 44 धावांचे योगदान दिले.

जयसूर्याची अप्रतिम गोलंदाजी

न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी 2 बाद 22 धावसंख्येवरुन डावाला सुरुवात केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी लंचब्रेकपूर्वीच न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. यामध्ये जयसूर्याने 18 षटकात 22 धावा देत 6 बळी घेतले. त्याने डेव्हॉन कॉनवे (9), केन विल्यम्सन (7), डॅरिल मिशेल (13), टॉम ब्लंडेल (1), कर्णधार टीम साऊदी (2) आणि ग्लेन फिलिप्स (0) यांना बाद केले. तर निशान पेरीसने तीन आणि असिथा फर्नांडोने एक विकेट घेतली. न्यूझीलंडकडून मिचेल सँटेनरने सर्वाधिक 29 धावा केल्या, इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. 32 वर्षीय जयसूर्याने कारकिर्दीत नवव्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. गॅले स्टेडियमवर त्याने आठ वेळा ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने एकूण 9 विकेट्स घेतले होते.

फॉलोऑननंतरही किवीज संघाचा डाव घसरला

514 धावांची आघाडी घेतल्यानंतर श्रीलंकेने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. फॉलोऑननंतर खेळताना पहिल्याच षटकात किवीज सलामीवीर टॉम लॅथमला फिरकीपटू निशान पेरीसने बाद केले. लॅथमला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर डेव्हॉन कॉनवे व केन विल्यम्सन यांनी 97 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना कॉनवे बाद झाला. त्याने 62 चेंडूत 61 धावा केल्या. पाठोपाठ विल्यम्सनही 46 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. रचिन रविंद्र व डॅरेल मिचेलही पाठोपाठ बाद झाल्याने किवीज संघाची 5 बाद 121 अशी स्थिती झाली होती. पण, टॉम ब्लंडेल व ग्लेन फिलिप्स यांनी 78 धावांची भागीदारी करत दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ब्लंडेल 47 तर फिलिप्स 32 धावांवर खेळत होते. दरम्यान, एका डावाने पराभव टाळण्यासाठी न्यूझीलंडला किमान 190 धावा कराव्या लागतील.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका प.डाव 5 बाद 602 घोषित

न्यूझीलंड प.डाव सर्वबाद 88, फॉलोऑननंतर दु.डाव 41 षटकांत 5 बाद 199 (डेव्हॉन कॉनवे 61, केन विल्यम्सन 46, रविंद्र 12, ब्लंडेल खेळत आहे 47, फिलिप्स खेळत आहे 32, निशान पेरीस 3 बळी व जयसूर्या, डी सिल्वा प्रत्येकी 1 बळी).

लंकेला 514 धावांची आघाडी

श्रीलंकेला पहिल्या डावात 514 धावांची आघाडी मिळाली आहे. कसोटी इतिहासातील पहिल्या डावातील ही 5 वी सर्वात मोठी आघाडी आहे. 1938 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 702 धावांची आघाडी घेतली होती. 2006 मध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 587 धावांची आघाडी घेतली होती.

कसोटीत पहिल्या डावात सर्वाधिक धावांची आघाडी

702 इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया, द ओव्हल 1938

587 दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका, कोलंबो 2006

570 पाकिस्तान वि न्यूझीलंड, लाहोर 2002

563 इंग्लंड वि वेस्ट इंडिज, किंग्स्टन 1930

514 श्रीलंका वि न्यूझीलंड, गॅले 2024.

केन विल्यम्सनच्या नावे नकोसा विक्रम

श्रीलंका व न्यूझीलंड कसोटी दरम्यान न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यम्सनच्या नावे नकोसा विक्रम जमा झाला. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विल्यमसन 4 तासांत दोनदा बाद झाला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.25 वाजले होते. यानंतर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात विल्यम्सन 46 धावा करून बाद झाला. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार दुपारचे 2.15 वाजले होते. अशाप्रकारे केन विल्यमसन  4 तासांत दोनदा बाद झाला. कसोटी फॉरमॅटमध्ये एखादा फलंदाज 4 तासांत दोनदा पॅव्हेलियनमध्ये परतण्याची घटना फार दुर्मिळ आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article