सांगलीच्या लोकसभा जागेशी राष्ट्रवादीचा कसलाच संबंध नाही- जयंत पाटील
सुरूवातीला लढण्याचा विचार होता शिवसेना व काँग्रेस आग्रही : आदला- बदलीनंतर लवकरच निर्णय
इस्लामपूर प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदार संघातून आमचा लढण्याचा विचार होता. पण महाविकास आघाडीतील चर्चेतील मतदार संघांच्या वाटणीमध्ये येथील जागा काँग्रेस किंवा शिवसेनेला लढेल. सांगलीच्या जागेशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कसलाच संबंध नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
आ. पाटील यांनी इस्लामपुरात पत्रकरांशी संवाद साधला. ते म्हणाले, उध्दव ठाकरे शिवसेनेची सांगली, कोल्हापूर, हातकणंगलेसाठी मागणी होती. अंतर्गत चर्चेत सर्वप्रथम त्यांनी सांगलीची जागा मागितली. सांगलीसाठी काँग्रेसचा आग्रह होता व आजही आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरमधून छ. शाहू महाराज हे काँग्रेसमधून लढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कोल्हापूरच्या बदल्यात दुसरीकडे जागा द्या, असे सेनेचे म्हणणे आहे. हातकणंगले येथून ठाकरे शिवसेनेचा उमेदवार राहिल्यास काही तरी मार्ग निघेल. यावर अंतिम निर्णय लवकरच होईल.
पाटील म्हणाले, सुरूवातीला सांगली लढण्याचा आमचा विचार होता. पण काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी 1-1 जागा लढावी, असे ठरले. कोल्हापूर जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेनेचा दुसऱ्या जागांसाठी आग्रह वाढला आहे. त्यामुळे आमचा सांगलीच्या जागेशी कसलाच संबंध नाही. दरम्यान त्यांनी हातकणंगले मधून राष्ट्रवादी लढणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.
संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे निश्चित जागा वाढतील. उद्या बुधवारी नाशिक जिह्यातील निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दिलीपराव पाटील, अॅड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे उपस्थित होते.