बेळगावात ‘जयमाला शिलेदार नाट्यागृह’ उभारणार
डॉ. किरण ठाकुर यांची माहिती : जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ : ?‘स्वरमाऊली जयमाला?’ ध्वनिचित्रफीत प्रदर्शित
पुणे : बेळगाव येथे साकारत असलेल्या वातानुकूलित नाट्यागृहाचा भूमिपूजन समारंभ जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षातच होणार असून, नाट्यागृहाला जयमाला जयराम शिलेदार नाट्यागृह असे नाव देण्यात येणार असल्याचे ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष, तसेच ‘तऊण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी शुक्रवारी पुण्यात जाहीर केले. मराठी रंगभूमी, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यासेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त जयमालाबाई शिलेदार यांची सांगीतिक कारकीर्द उलगडणारी ?‘स्वरमाऊली जयमाला?’ ही ध्वनिचित्रफीत सुप्रसिद्ध लेखिका ज्ञानदा नाईक यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
टिळक रोडवरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात आयोजिलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ट्रस्टच्या अध्यक्ष दीप्ती शिलेदार-भोगले उपस्थित होत्या. याप्रसंगी जयमालाबाई शिलेदार यांच्या सुऊवातीच्या कारकीर्दीपासून तानपुरा बनविणारे सांगलीच्या मिरजकर कुटुंबातील आजच्या पिढीतील कलाकार मजिदभाई मिरजकर यांचा, तसेच संगीत नाट्याप्रयोगाआधी रंगमंच पूजनावेळी संपूर्ण आसमंत सुगंधाने दरवळून टाकणाऱ्या दामोदरदास भगवानदास सुगंधीचे संचालक देवेंद्र सुगंधीवाले यांचा विशेष गौरव डॉ. किरण ठाकुर व उल्हास पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तर पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या संचालिका शुभांगी दामले यांना जयमालाबाई शिलेदार यांचे छायाचित्र दीप्ती शिलेदार-भोगले यांच्या हस्ते भेट देण्यात आले.
यावेळी डॉ. किरण ठाकुर म्हणाले की, शिलेदार कुटुंबीयांनी संगीत नाटकाची परंपरा आजवर सुरू ठेवली आहे. बेळगावात शिलेदार कुटुंबियांची अनेक संगीत नाटके पाहण्याचा योग मला आला. मी वयाच्या सहाव्या वषी पाहिलेली नाटकातील राजकन्या म्हणजे कीर्ती शिलेदार होत. बेळगाव येथे साकारत असलेल्या नाट्यागृहाचा भूमिपूजन समारंभ जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीवर्षात होणार असून नाट्यागृहाला जयमाला जयराम शिलेदार नाट्यागृह असे नाव देण्याचे निश्चित केले आहे. महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावमधील रसिक संगीत नाटकवेडे आहेत. संगीत नाटकात अभिनय करणाऱ्या व्यक्तीने गायक असणे आवश्यक आहे. असे गायक कलाकार आजच्या पिढीतही निर्माण व्हावेत तसेच संगीत नाटकांचा सुवर्णकाळ गाजविणाऱ्या कलाकारांची ओळख चित्रपटाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आईची महानता समजून घेतेय : दीप्ती शिलेदार-भोगले
मनोगत व्यक्त करताना दीप्ती शिलेदार-भोगले म्हणाल्या, की माझी आई जयमाला शिलेदार यांच्यावर ध्वनिचित्रफीत निर्माण करत असताना तिचे अनेक पैलू पहिल्यांदाच जाणवले. आई एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून किती महान होती, हे मी आजही समजून घेत आहे. रंगमंचावर साभिनय गाणे कसे सादर करावे, पात्राशेजारी उभे राहताना हावभाव कसे ठेवावेत, शब्दांची फेक कशी असावी, गायनाबरोबरच संवाद कसे सादर करावेत, असे अनेक बारकावे या ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून आजच्या पिढीला शिकायला मिळतील, असा विश्वास वाटतो. जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या वर्षात विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर यांनी प्रास्ताविकात दिली. मान्यवरांचे स्वागत ट्रस्टचे विश्वस्त माऊतराव जाधव यांनी केले. सत्कारार्थींचा परिचय अतुल खांडेकर यांनी करून दिला, तर आभार निनाद जाधव यांनी मानले.
जन्मशताब्दीनिमित्त लोकमान्य सोसायटीकडून दरमहा पाच लाखांची देणगी
जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकमान्य सोसायटी’कडून वर्षभर होणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी दरमहा पाच लाख ऊपयांची देणगीही डॉ. किरण ठाकुर यांनी यावेळी जाहीर केली.