गोव्यात विविध ठिकाणी आज जत्रोत्सव
प्रतिनिधी / पणजी
गोवा, भारताच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक, आपल्या सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. राज्यभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांची मोठी परंपरा आहे. आज गोव्यात विविध ठिकाणी अनेक जत्रोत्सवांची पर्वणी गोमंतकीयांना मिळणार आहे. गोव्यातील जत्रोत्सव हे केवळ धार्मिक पर्व नव्हे, तर समाजाच्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते. सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘गोमंतकातील जत्रोत्सव’. स्थानिक परंपरा आणि संस्कृतीच्या गोड गोष्टींना ओळखून, गोव्याच्या जीवनशैलीला समृद्ध करणारा अनुभव जत्रोत्सवातून मिळतो.
गोव्यात आज कार्तिक अमावस्यानिमित्त विविध ठिकाणी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत असले तरी प्रामुख्याने 12 गावात 12 प्रसिद्ध जत्रोत्सवांचे आयोजन केले जाते. या 12 गावाच्या बाराही जत्रोत्सवात ‘दिवजोत्सवाला’ प्रामुख्याने महत्त्व दिले जाते. काही ठिकाणी रात्री तर काही ठिकाणी पहाटे या दिवजोत्सवाचे आयोजन केले जाते.
श्री नवदुर्गा जत्रा कुंडई, श्री वेताळ जत्रा हळर्ण पेडणे, श्री चामुंडेश्वरी जत्रा वरगाव, श्री गजांतलक्ष्मी जत्रा वळवई, श्री भगवती जत्रा पार्से, श्री कपिलेश्वर जत्रा फोंडा, श्री बेताळ जत्रा आमोणा, श्री शांतादुर्गा जत्रा खांडेपार, श्री शांतादुर्गा जत्रा कुंकळ्ये म्हार्दोळ, श्री वनदेवी जत्रा मुळगाव, श्री शर्वाणी जत्रा अडवलपाल, श्री सप्तशती भूमिका जत्रा पर्ये सत्तरी सर्वसामान्यपणे या प्रमुख जत्रांचा समावेश आपल्याला या 12 गावांच्या 12 जत्रांमध्ये दिसून येतो. गावागावांत दिवजांच्या जत्रा होतात. त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे इतर जत्रांही होतात. जत्रा हा आपल्या आराध्य दैवताचा वार्षिक उत्सव असल्याने त्याचा उत्साह वेगळाच असतो. आपल्या दैवताशी निगडित पारंपरिक विधी, रितीरिवाज करण्यासाठी, त्यांच्याविषयी भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी वार्षिक जत्रेचे आयोजन केले जाते. सुवासिनीस्त्रिया पारंपरिक नऊवारी वेषात, हातात पारंपरिक मातीच्या, आधुनिक धातुची दिवजे घेऊन मंदिराची प्रदक्षिणा काढतात. पारंपरिक दशावतारी नाट्याप्रयोग स्थानिक लोक जागरण करून उत्साहाने बघायला बसतात. जत्रोत्सवातील हा आनंद वेगळाच असतो. या जत्रोत्सवा दरम्यान भरणारी फेरी, त्यात गोमंतकीय पारंपरिक खाज्यांच्या दुकानांवर आज सर्वत्र गर्दी पाहायला मिळणार आहे.
या जत्रोत्सवांदरम्यान, भक्तगण आध्यात्मिक वातावरणात गुंतलेले असतात. या सर्व उत्सवांमध्ये देवते, श्रद्धा आणि परंपरेचा आदर यांचा मिलाफ पाहता येतो. गोव्यातील प्रत्येक जत्रा अनोखा अनुभव देतात. भौगोलिक आकाराने अगदी छोट्या असलेल्या गोव्याचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. आज मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असली तरी जत्रांमधून वेगळाच आनंद प्राप्त होतो. जत्रा तर येथील उत्सवांचा आरसाच म्हणावा लागेल. कारण वर्षातून एकदा होणारी जत्रा महत्त्वपूर्ण उत्सव असतो. गोव्यातील माणूस आणि देव यांच्यातील ऋणानुबंध अनुभवायचे असतील तर प्रत्येकाने या जत्रोत्सवांना भेट देणे गरजेचे ठरते.