जटगे-हलसाल रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत
भागातील ग्रामस्थांना नाहक त्रास : कंत्राटदाराचे आडमुठे धोरण : कंत्राटदाराला लोकप्रतिनिधी पाठीशी घालत असल्याचा आरोप
खानापूर : खानापूर तालुक्यातील जटगे ते हलसाल या तीन कि. मी. रस्त्याच्या विकासासाठी 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर झाले होते. मार्च महिन्यात या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते केले होते. यानंतर कंत्राटदाराने या रस्त्यावर खडी पसरुन रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने गेल्या नऊ महिन्यापासून जटगे परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा जटगे-हलसाल ग्रामस्थांनी दिला आहे.
खानापूर तालुक्यातील गुंजी परिसरातील जटगे-हलसाल हा रस्ता खानापूर-लोंढा मार्गावरील कामतगे क्रॉसपासून सुरू होतो. कामतगा क्रॉस ते जटगा हे अंतर जवळपास 9 कि. मी. आहे. हा संपूर्ण रस्ता खाचखळग्यांमुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. जटगे ते हलसाल हा तीन कि. मी. चा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. या रस्त्याच्या विकासासाठी 1 कोटी 90 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यात रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात आमदारांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.
त्यानंतर दीड महिन्यांनी कंत्राटदाराने या रस्त्यावर मोठी खडी पसरुन कामाला सुरुवात केली होती. संपूर्ण रस्त्यावर मोठे बोर्डर (खडी) पसरल्याने या रस्त्यावरुन चालत जाणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन वाहतूक गेल्या काही महिन्यापासून बंद आहे. या भागातील ग्रामस्थांना आता गुंजीवरुन खानापूरशी संपर्क साधावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी जि. पं. कार्यालय आणि लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यास कंत्राटदाराला सूचना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
मात्र याकडे जि. पं. अधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पूर्वीचा रस्ता खड्ड्यांचा होता. मात्र खड्ड्यातून वाहतूक होत होती. मात्र कंत्राटदाराने गेल्या एप्रिलमध्ये खडी पसरुन गेल्यामुळे या रस्त्यावरुन साधे चालत जाणेही कठीण झाले आहे. पसरलेली खडी पूर्णपणे बाजूला गेल्याने रस्त्याचे काम दर्जेदार होईल की नाही, अशी शंका ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
आमदारांचा हतबलपणा
जटगे-हलसाल या रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा पंचायतीकडून 1 कोटी 90 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते मार्च महिन्यात करण्यात आले होते. यावेळी आमदारानी ग्रामस्थांनी जागरुक राहून रस्त्याचे काम चांगले करून घेण्यासाठी लक्ष घालावे, असे आवाहन केले होते. मात्र कंत्राटदाराने संपूर्ण रस्त्यावर खडी पसरल्याने रस्त्यावरुन चालत जाणेही कठीण झाले आहे. गेल्या आठ महिन्यापासून या रस्त्याचे काम पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी आमदारांची भेट घेऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करावी, अशी मागणी केली. यावेळी आमदारानी तुम्हीच कंत्राटदाराला सांगून काम करून घ्या, असा सल्ला दिल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी जि. पं. अधिकारी, कापोली ग्रा. पं. चे पीडीओ यांच्याशी संपर्क सांधून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली. येत्या आठ दिवसात रस्ताकामाला सुरुवात न झाल्यास खानापूर येथील जि. पं. च्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा ‘तरुण भारत’शी बोलताना ग्रामस्थांनी दिला आहे.