ZP School Jat : ... अन्यथा पंचायत समितीतच शाळा भरवणार, पालकांनी असा का घेतला निर्णय?
छताला पडलेल्या मोठ्या भेगांमधून पावसाचे पाणी थेट वर्गखोलीत पडते
By : शिवराज काटकर
जत : जत तालुक्यातील तांबेवाडी (घोलेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. सध्या या शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन शिक्षक कार्यरत असलेल्या या शाळेच्या दोन्ही इमारती (एक आरसीसी व दुसरी पत्र्याची) गेल्या चार ते पाच वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहेत.
यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली असून सतत सुरू असलेल्या संततधारेमुळे इमारतीचे छत गळायला लागले आहे. छताला पडलेल्या मोठ्या भेगांमधून पावसाचे पाणी थेट वर्गखोलीत पडत आहे.
या परिस्थितीत लहान मुलांना गळक्या इमारतीत बसवायचे तरी कसे असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी शाळेत बसले असताना काही अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल पालक करू लागले आहेत. त्यांच्या मते, शाळा ही ज्ञानाचे मंदिर असते. पण येथे मात्र ती जीव धोक्यात घालण्याचे ठिकाण बनली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी २०२२-२३ मध्येच इमारतीच्या निर्लेखनासाठी जत पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना, तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनाही निवेदनाद्वारे ही माहिती दिली होती.
आमदारांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते, तरीदेखील अद्याप काहीही घडलेले नाही. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीता सुरेश तांबे, उपाध्यक्ष आणि इतर पालकांनी ठाम भूमिका घेत, येत्या १६ जूनपासून शाळा जत पंचायत समितीच्या कार्यालयातच भरवली जाईल, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
"गळक्या छताखाली आम्ही आमची मुलं बसवू शकत नाही. इमारतीचा एखादा भाग कोसळला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने तत्काळ नवी जागा किंवा इमारतीची व्यवस्था करावी, अन्यथा हा निर्णय अंतिम राहील."
- धनाजी खंडू तांबे पालक